अयोध्येतील 5 एकर जमीन घेण्यास सुन्नी वक्फ बोर्ड तयार

506

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अनुसरून उत्तर प्रदेश सरकारने देऊ केलेली अयोध्येतील 5 एकर जमीन स्वीकारण्यास अखेर सुन्नी वक्फ बोर्ड तयार झाले आहे. बोर्डाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत जमीन स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या जमिनीवर मशिदीसह हॉस्पिटल, इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटर आणि सार्वजनिक ग्रंथालय उभारले जाणार आहे.  श्रीराम जन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने राममंदिरचा मार्ग मोकळा करीत मशिदीसाठी अयोध्येतच पर्यायी 5 एकर जमीन देण्याचे निर्देश दिले होते. त्याला अनुसरून योगी सरकारने उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकरची जमीन देऊ केली, मात्र बोर्डाने ही जमीन स्वीकारू नये अशी भूमिका मुस्लिम समाजातील काही लोकांकडून होऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर सुन्नी वक्फ बोर्डाच्या सोमवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर संबंधित 5 एकर जमीन स्वीकारण्याचा निर्णय बोर्डाने घेतला.

मशिदीसाठी ट्रस्ट स्थापणार

अयोध्येतील 5 एकर जमिनीवर मशीद उभारण्यासाठी लवकरच ट्रस्ट स्थापन केली जाईल. स्थानिक लोकांची मते विचारात घेऊन मशिदीच्या बांधकामाचा निर्णय घेतला जाईल, असे उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झुफर फारुकी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या