
सामना ऑनलाईन । मुंबई
नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पध्दतीने करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’ही छायाचित्रणाची अनोखी स्पर्धा एक जानेवारीला आयोजित केली आहे. कारण महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्यात तर सर्वात शेवटी मुंबईमध्ये होतो. या दोन जिल्ह्यातल्या नागरिकांनी नव्या वर्षातील सूर्योदयाची अनोखी छायाचित्रे काढण्याची ही स्पर्धा आहे.
गोंदिया हा महाराष्ट्रातला ‘उगवत्या सूर्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पहिला सूर्योदय गोंदियात होतो. तिथे सूर्योदय झाल्यानंतर सुमारे 27 मिनिटांनी मुंबईत सूर्य उगवतो. या भौगोलिक वैशिष्ट्याला अधोरेखित करण्यासाठी पर्यटक, छायाचित्रकार, विद्यार्थी, नागरिक यांनी गोंदिया आणि मुंबईतील नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अनोखी छायाचित्रे काढून ती कल्पक फोटोओळीसह पाठवावी. पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रकारांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये दोन रात्री एक दिवसाचा मोफत स्टे दिला जाईल, असे एमटीडीसीटी व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले. छायाचित्रे [email protected] या ईमेलवर पाठवावीत.
गोंदिया आकर्षणाचे केंद्र
गोंदिया हा जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यालगत आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. दाट वनसंपदेने वेढलेला एक निसर्गरम्य जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. नागझिरा वने, नवेगाव राष्ट्रीय उद्यान यांमध्ये विपूल वनसंपदा आणि जैवविविधता आहे. धानाचे कोठार आणि तलावांचा जिल्हा अशीही गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे निसर्गात रमणाऱ्या पर्यटकांसाठी हा जिल्हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहीला आहे. शिवाय हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रावर पडणारी पहिली सूर्यकिरणे या जिल्ह्यावरच पडतात. जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव, गोंदिया, देवरी हे तालुके राज्याच्या टोकावर वसले असून तेथून मध्यप्रदेश किंवा छत्तीसगड राज्यांचा प्रारंभ होतो.
मुंबईत 27 मिनिटे उशिरा सूर्योदय
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही पश्चिमेकडे असून मुंबई हे एक प्रमुख शेवटचे टोक आहे. महाराष्ट्राचा सूर्यास्त कोकण किनारपट्टीवर होतो. कोकण किनारपट्टी आणि मुंबई शहर हे अतिपश्चिमेकडे असल्याने येथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही उशिरा होतात. गोंदिया जिल्ह्याच्या तुलनेत मुंबईत साधारण 27 मिनीटे उशीरा सूर्योदय होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे 994 किमी इतके अंतर आहे. पृथ्वीला हे अंतर पार करण्यास साधारण 27 मिनीटे लागतात.





























































