
सामना प्रतिनिधी । मुंबई
येत्या 21 जानेवारीला खग्रास चंदग्रहण होणार असून या वेळी ‘ब्लडमून, सुपरमून व वुल्फमून’ दर्शनाचा योग आला आहे. चंद्रग्रहण आणि ब्लडमून हिंदुस्थानातून पाहता येणार नाही. फक्त सुपरमूनचेच दर्शन हिंदुस्थानातून होईल.
पौष पौर्णिमेच्या दिवशी सोमवार, 21 जानेवारी रोजी हिंदुस्थानी प्रमाण वेळेप्रमाणे सकाळी 9 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 21 मिनिटांपर्यंत हे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या वेळी चंद्रबिंब आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण मिडल ईस्ट, आफ्रिका, यूरोप, अमेरिका, ओसेनिआ आणि रशियाचा पूर्वभाग येथून दिसणार आहे. या देशातील खगोलप्रेमी मोठय़ा उत्साहाने या घटनेची वाट पाहात आहेत. कारण या ठिकाणाहून ग्रहणाबरोबरच ब्लडमून, सुपरमून आणि वुल्फमून यांचेही दर्शन होणार आहे. हिंदुस्थानातून ‘सुपरमून’ म्हणजे मोठे व जास्त तेजस्वी चंद्रबिंब साध्या डोळ्यांनी पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.
पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब आकाराने 14 टक्के मोठे व 30 टक्के जास्त प्रकाशित दिसते. या चंद्राला ‘सुपरमून’ म्हणतात. या वेळी चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष, 57 हजार, 342 किमी. अंतरावर येणार आहे.
21 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेला चंद्र सायंकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन दुसऱया दिवशी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मावळेल.
नूतन वर्षातील पहिल्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘वुल्फमून’ असे म्हणतात.
16 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
हिंदुस्थानातून दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण 16 जुलै रोजी होणार आहे. तसेच सुपरमून दिसण्याचा योग पुन्हा याच वर्षी माघ पौर्णिमेच्या रात्री 19 फेब्रुवारी रोजी येणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

























































