
घाटकोपर येथे बोगस कॉल सेंटर थाटून नागरिकांना फसविण्याचा सुरू असलेला गोरखधंदा उद्ध्वस्त केल्यानंतर गुन्हे शाखेने या गुह्यातील आणखी दोन फरार आरोपींना पकडले. ते दोघे कॉल सेंटरला सिमकार्ड आणि नागरिकांची माहिती पुरविण्याचे काम करत होते.
घाटकोपर पश्चिमेकडील एम. जी. मार्गावर असलेल्या श्रीपाळ इमारतीत टाटा कॅपिटलच्या नावाने बोगस कॉल सेंटर सुरू होते. नागरिकांना गृह व वैयक्तिक कर्ज देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली जात असल्याची माहिती युनिट-3 चे एपीआय प्रकाश लिंगे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक शामराव पाटील, लिंगे, उपनिरीक्षक सिद्धेश ज्योष्ठs आदींच्या पथकाने त्या बोगस कॉल सेंटरची अधिक माहिती काढून तेथे धडक दिली व सतीश दुर्गुळे (27), सागर फाटक (27), प्रथमेश पाताडे (24) आणि दीपिका माळी (24) अशा चौघांना अटक केली होती. या चौघांनी विमा काढायच्या नावाने लोकांकडून पैसे घेत ते दोन बँकांच्या खात्यात जमा केले होते. त्यांचे अन्य दोन साथीदार आकाश बिंद आणि आशीष शुक्ला हे फरार झाले होते. मात्र त्या दोघांनाही अटक करण्यात आली. हे आरोपी त्या चौघांना सिम आणि नागरिकांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यायचे. लोकांच्या लुटलेल्या रकमेतील 40 टक्के रक्कम हे आरोपी त्यांच्या बँक खात्यात वळते करून घ्यायचे.
कोकणी भाषेत बनवाबनवी
सतीश, सागर, प्रथमेश आणि दीपिका हे चौघेही कोकणातले आहेत. कोकणी भाषेचाच वापर करत चौघांनी कोकणातील नागरिकांशी संपर्क साधला आणि लोनच्या बहाण्याने त्यांना चुना लावला. आरोपी लोकांशी कोकणी भाषेतच संवाद साधायचे. त्यामुळे नागरिकदेखील त्यांच्या आमिषाला बळी पडल्याचे सांगण्यात आले.
























































