ठाण्यात ‘मिंधे’ गटाच्या गुंडांचा पोलिसांसमोरच हैदोस, शिवसैनिकांना पोलीस ठाण्यातच कोंडले

हल्ला झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्यात गेलेल्या शिवसैनिकांना ‘मिंधे’ गटाच्या गुंडांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत कोंडून ठेवले. रात्री 10.30 वाजल्यापासून मध्यरात्री 2.30 पर्यंत मिंधे गटाच्या गुंडांचा पोलिसांसमोरच हा हैदोस सुरू होता. मात्र पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून मिंधे सरकारची शिवसैनिकांवर दडपशाही सुरू असल्याचा संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला. या घटनेने ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळावे, पदाधिकार्यांच्या बैठका, दौरे धडाक्यात सुरू असल्याने मिंधे गटाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघातील किसननगर येथील भटवाडी परिसरात नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख,जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते चिंतामणी कारखानिस आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

बैठक सुरू असतानाच मिंधे गटाच्या 150 गुंडांनी रात्री 10.15 च्या सुमारास बेसावध शिवसैनिकांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी उपशहर प्रमुख दीपक साळवी आणि हेमंत नार्वेकर यांना घेरले आणि त्यांना बेदम मारहाण केली. हे दोघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दिली

या हल्यानंतर खासदार राजन विचारे, मधुकर देशमुख, केदार दिघे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्यासह शिवसैनिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत मि॑धे गटाच्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी पुराव्यांची पडताळणी करत रात्री उशिरापर्यंत श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक मिंधे गटाच्या 200 ते 300 जणांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला.त्यातील काही जण पोलिस ठाण्यात घुसले आणि शिवसैनिक बाहेर कसे पडतात ते आम्ही बघतो असा आरडाओरडा करत त्यांनी अख्खे पोलिस ठाणे वेठिला धरले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर हा तमाशा सुरू होता. रात्री 11 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2.30 पर्यंत मिंधे गटाचे गुंड शिवसैनिकांना शिवीगाळ करत धमक्या देत होते. आणि सर्व पोलीस अधिकारी शांतपणे पाहत होते. ही घटना कळताच ठाण्यातील शिवसैनिकही मोठ्या संख्येने श्रीनगर पोलिस ठाण्याबाहेर गोळा झाले होते. शिवसैनिकांवरील हल्ला आणि पोलीस ठाण्यातील धिंगाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरून सुरू आहे का असा संतप्त सवाल त्यांनी केला.

या घटनेमुळे पोलीस ठाण्यात आणि किसन नगर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.