
हिंदुस्थानची महिला कुस्तीगीर विनेश फोगाटचा अखेर मोठा विजय झाला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर क्रीडा संघटनांच्या वेळापत्रकात आणि नियमांमध्ये होणाऱ्या अतिघाईच्या हस्तक्षेपावर न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हिंदुस्थान कुस्ती महासंघाने विनेशविरोधात याचिका दाखल केली होती, यावर सर्वोच्च न्यायालयाने विनेशला मोठा दिलासा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे विधान
ही सुनावणी होत असताना सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटच्या क्रीडा कामगिरीची प्रशंसा केली आणि त्यानंतर एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. विनेशबाबत न्यायालयाने म्हटले की, ‘जर तिच्या जागी दुसरी कोणी खेळाडू असती तर परिस्थिती वेगळी असती. विनेशने देशाला अभिमान मिळवून दिला आहे.’ एकीकडे न्यायालयाने विनेशची प्रशंसा तर केली, पण दुसरीकडे विनेशला देशाची प्रतिष्ठा आणि खेळाच्या नियमांची आठवण करून दिली आहे. न्यायालयाने आपल्या सुनावणीत विनेशला स्पष्टपणे सांगितले, ‘तुम्ही एक उत्कृष्ट खेळाडू आहात. पण देश प्रथम येतो. त्यामुळे देशाचा विचार कधीही पहिल्यांदा करायला हवा.’
VIDEO | Delhi: Wrestler Vinesh Phogat reaches IGI stadium.
The Supreme Court on Friday allowed wrestler Vinesh Phogat to participate in the Asian Games 2026 selection trials to be held on May 30.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/IP6UZxlryQ
— Press Trust of India (@PTI_News) May 30, 2026
सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिल्ली उच्च न्यायालयाने हे प्रकरण हाताळण्याच्या पद्धतीवर आणि कार्यप्रणालीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता आणि नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, क्रीडा संघटनांच्या तांत्रिक आणि निवड प्रक्रियेत न्यायालयांकडून होणारा असा हस्तक्षेप ही एक मोठी समस्या बनत आहे. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांनी एक अत्यंत कठोर शब्दांत टिप्पणी करताना म्हटले आहे की, ‘हे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश नाहीत; हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ आहेत. न्यायालयांनी अशा प्रकारे हस्तक्षेप करून संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत करणे किंवा त्यात व्यत्यय आणणे अशक्य आहे.’
संपूर्ण वाद काय होता?
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांचे वेळापत्रक आणि नियमांसंदर्भात हिंदुस्थान कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटूंमध्ये वाद होता. विनेशने याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली, जिथे उच्च न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला आणि तिला चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली. कुस्ती महासंघाने या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने विनेशची पात्रता लक्षात घेऊन तिला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली. परंतु क्रीडा धोरण आणि वेळापत्रकावर महासंघाचे अधिकारक्षेत्र मान्य करून भविष्यासाठी न्यायालयांना एक कडक संदेश दिला.



























































