जा, तुरुंगाची मजा घ्या! मुस्लिम तरुणांना मारहाण प्रकरणी पोलिसांवर न्यायालय संतापले

सुप्रीम कोर्टाने गुजरात पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील 5 जणांना सार्वजनिकरित्या मारहाण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही घटना 2022 सालची असून मुस्लिम तरुणांना खांबाला बांधून मारहाण करण्यात आली होती. लोकांना खांबाला बांधून मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

सदर प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने निरीक्षक ए.व्ही. परमार, उप निरीक्षक डीबी कुमावत, हवालदार केएल धाबी आणि आरआर धाबी यांना 14 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला या पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. सदर याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटले की, ‘लोकांना खांबाला बांधून मारहाण करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? जा, तुरुंगाची मजा घ्या. न्यायमूर्ती गवई यांच्याप्रमाणेच त्यांचे खंडपीठातील सहकारी न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी म्हटले की, ‘हा कसला अत्याचार आहे? लोकांना खांबाला बांधायचं, सार्वजनिक ठिकाणी मारहाण करायची त्याचा व्हिडीओ काढायचा आणि यात न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी तुमची इच्छा आहे?

पोलिसांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे म्हणाले की, या पोलिसांविरोधात फौजदारी खटला सुरू असून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगही सदर प्रकरणाचा तपास करत आहे. दवे यांनी पुढे म्हटले की, ‘आदेश जाणूनबुजून न पाळल्याबद्दल पोलिसांविरोधात कोणताही गुन्हा नाहीये.’ यासाठी दवे यांनी सर्वोच्च न्यायालयाने 1996 मध्ये डीके बसू खटल्याचा हवाला दिला होता. डीके बसू खटल्यामध्ये न्यायालयाने संशयिताला अटक करून चौकशी करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. दवे यांनी पुढे म्हटले की सदर प्रकरणी प्रश्न उभा राहतोय तो उच्च न्यायालयाच्या अवमानाच्या अधिकारक्षेत्राचा आहे. डीके बसू प्रकरणानंतर जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची पोलिसांनी जाणीवपूर्वक अवहेलना केली का हा मुख्य प्रश्न असल्याचे दवे यांनी म्हटले. यावर न्यायमूर्ती गवई यांनी म्हटले की कायद्याकडे दुर्लक्ष करणे हा बचाव होऊ शकत नाही, डीके बसू प्रकरणात कायदा काय म्हणतो हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला माहित असले पाहिजे. आम्ही कायद्याचे विद्यार्थी असल्यापासून डीके बसूंच्या निकालाबद्दल ऐकत आहोत. न्यायमूर्ती गवई यांनी म्हटले की जा, तुरुंगाची मजा घ्या, तिथे तुमचे अधिकारी हेच यजमान असतील, ते तुमची विशेष खातिरदारी करतील.