
सरकारी नोकर भरतीतील ओपन अर्थात खुला प्रवर्ग कोणत्याही एका विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव नाही. खुल्या प्रवर्गातील जागांवर अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांचा मेरीटच्या आधारे तितकाच हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशभरातील आरक्षित प्रवर्गातील लाखो गुणवंत उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रशासन आणि रजिस्ट्रार यांनी भरती प्रक्रियेशी संबंधित याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिकांवर न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने निकाल दिला. खंडपीठाने खुल्या प्रवर्गात आरक्षित प्रवर्गातील गुणवंत उमेदवारांचा असलेला हक्क अधोरेखित केला आणि राजस्थान उच्च न्यायालयाचा 18 सप्टेंबर 2023 रोजीचा निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका खंडपीठाने फेटाळल्या. राजस्थान उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालये आणि संलग्न संस्थांमधील कनिष्ठ न्यायिक सहाय्यक आणि लिपिक ग्रेड-2च्या 2,756 पदांसाठी ऑगस्ट 2022मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने भरती प्रक्रिया सुरू केली होती. निवड प्रक्रियेत 300 गुणांची लेखी परीक्षा आणि त्यानंतर 100 गुणांची संगणकावर आधारित टंकलेखन चाचणी समाविष्ट होती. मे 2023मध्ये लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात एससी, ओबीसी, एमबीसी व ईडब्ल्यूएस यांसारख्या आरक्षित प्रवर्गांचे कट-ऑफ गुण सर्वसाधारण प्रवर्गाच्या कट-ऑफपेक्षा जास्त होते. यादरम्यान सर्वसाधारण प्रवर्गाच्या कट-ऑफपेक्षा जास्त, परंतु स्वतःच्या प्रवर्गाच्या कट-ऑफपेक्षा कमी गुण मिळालेल्या काही आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना चाचणीच्या शॉर्टलिस्टमधून वगळण्यात आले होते. त्याविरोधात आरक्षित प्रवर्गातील गुणवंत उमेदवारांनी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा खुल्या प्रवर्गातील अधिकार मान्य केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा मिळाला.
न्यायालय म्हणाले..
खुल्या प्रवर्गातील जागा कोणत्याही विशिष्ट जाती किंवा गटासाठी आरक्षित नाहीत. त्या प्रत्येकासाठी खुल्या आहेत. खुला प्रवर्ग गुणवत्तेच्या आधारावर सर्व उमेदवारांसाठी खुला आहे.
आरक्षणाची उपलब्धता ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील पात्र उमेदवारांना केवळ गुणवत्तेच्या आधारावर अनारक्षित जागेसाठी निवडले जाण्यापासून रोखू शकत नाही.
जर लेखी परीक्षेत आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने खुल्या प्रवर्गाच्या कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले असतील, तर मुलाखतीच्या टप्प्यात त्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गाचा उमेदवार मानले जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी वेळी जर उमेदवाराचे एकूण गुण खुल्या प्रवर्गाच्या कट-ऑफपेक्षा कमी असतील तर त्याची गणना त्याच्या मूळ आरक्षित प्रवर्गात केली जाईल. तो आरक्षणाच्या लाभांसाठी पात्र असेल.





























































