
उच्च जातीतील व्यक्तींना नाहक गोवण्यासाठी एससी-एसटी अॅक्टच्या होणाऱ्या गैरवापराला सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला आहे. चार भिंतीआड केली जाणारी जातिवाचक टिप्पणी ही अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा ठरू शकत नाही. आरोपीने तक्रारदाराचा जातीवरून जाणूनबुजून छळ केल्याचे सिद्ध झाले तरच तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरेल. केवळ कनिष्ठ जातीतील व्यक्तीने आरोप केला म्हणून उच्च जातीतील व्यक्तीला कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.
अॅट्रॉसिटी कायद्याखाली नोंदवलेला गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत उत्तराखंडच्या हितेश वर्मा या रहिवाशाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला त्याने आव्हान दिले होते. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती एल. नागेस्वरा राव, हेमंत गुप्ता आणि अजय रस्तोगी यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने निकाल दिला. आरोपी वर्मा आणि तक्रारदार महिला या दोघांमध्ये उत्तराखंडच्या जमिनीवरून वाद सुरू होता. या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 2008 च्या आदेशाचा हवाला दिला. सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक टिप्पणी केली गेली असेल तरच तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्याआधारे निकाल देत याचिकाकर्ता वर्माची महिलेला जातीसंबंधी शिवीगाळ केल्याच्या फौजदारी गुन्ह्यातून सुटका केली.
उत्तराखंडचे नेमके प्रकरण काय?
याचिकाकर्ता वर्माचा कनिष्ठ जातीतील महिलेशी जमिनीवरून वाद सुरू होता. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महिलेने वर्मा याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार नोंदवली होती. वर्मा व त्याच्या साथीदारांनी मला शेती करण्यापासून बळजबरीने रोखले तसेच जातिवाचक शिवीगाळ केली असा आरोप महिलेने केला होता, मात्र हा आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
न्यायालय काय म्हणाले?
- उच्च जातीतील व्यक्ती आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी कायदेशीर पाऊल उचलत आहे म्हणून तिला अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात गोवणे चुकीचे आहे.
- सार्वजनिक ठिकाणी केली जाणारी जातिवाचक टिप्पणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरते. मात्र घर वा बंद खोलीत जर पुणी जातीवरून अपशब्द वापरला असेल व तिथे कुणी तिसरी व्यक्ती नसेल तर तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरू शकत नाही.
- केवळ तक्रारदार अनुसूचित जाती-जमातीतील आहे म्हणून अॅट्रॉसिटी कायद्याखाली कोणत्याही गुन्ह्याचा स्वीकार करता येणार नाही. आरोपीने जाणूनबुजून जातीवरून छळवणूक वा शिवीगाळ केल्याचे सिद्ध झाले तरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवता येईल.
























































