
सामना ऑनलाईन । मुंबई
रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय मध्यस्थता समितीला 18 जुलै रोजी आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर मध्यस्थता समितीने यावर तोडगा काढला नाही, तर 25 जुलैपासून दररोज या प्रकरणाची सुनावणी घेण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मध्यस्थता समितीच्या अहवालावरच पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी हे निर्देश देण्यात आले आहेत.
Hearing in SC on plea for early hearing on Ayodhya land dispute case: Supreme Court asks the mediation panel to submit a detailed report by July 25, https://t.co/eKR8G7Lj5v
— ANI (@ANI) July 11, 2019
या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी एक मध्यस्थता समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालाची आपल्याला वाट पाहावी लागेल आणि मगच निर्णय घेतला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे.
घटनापीठ घेणार महत्त्वपूर्ण निर्णय
सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. काय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ सुनावणी घेणार आहे. मार्च महिन्यात या घटनापीठाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद तोडग्यासाठी मध्यस्थीसाठी पाठवला होता. यासाठी कोर्टाने 3 सदस्यीय पॅनेलचीही स्थापना केली होती. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलीफुल्ला यांच्यासह आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश होता. न्यायालयाचे घटनापीठ या मध्यस्थांच्या अहवालावर अभ्यास करून लवकरात लवकर महत्त्वपूर्ण निर्णय घेईल, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली आहे.


























































