
दिल्ली दंगलीच्या आरोपाखाली अटकेत असलेला जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालीद व शार्जिल इमाम याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळला. इतकेच नव्हे तर पुढील वर्षभर त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्याच वेळी अन्य पाच आरोपींना 12 अटींसह जामीन मंजूर केला.
यूएपीए कायद्याच्या आधारे दिल्ली उच्च न्यायालयाने खालीदसह अन्य आरोपींना जामीन नाकारला होता. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. खालीदला बहिणीच्या लग्नासाठी नुकताच 15 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला होता. मात्र नियमित जामीन मिळवण्याचा त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. न्यायमूर्ती अरविंद पुमार आणि न्या. एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठापुढे आरोपींच्या अर्जावर सुनावणी झाली.
यांची झाली सुटका
या प्रकरणात जामीन मिळालेल्यांमध्ये गुलफिशा फातिमा, मीरा हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सालेम खान, शादाब अहमद यांचा समावेश आहे.
आता तुरुंग हेच आयुष्य
जामीन नाकारला गेल्यानंतर खालीदची जवळची मैत्रीण बनजोत्स्ना लाहिरी त्याच्याशी बोलली. कोर्टाच्या निर्णयावर त्याची प्रतिक्रिया काय होती हे तिने ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले. काही सहकऱयांना जामीन मिळाल्याबद्दल खालीदने आनंद व्यक्त केल्याचे ती म्हणाली. ‘उद्या भेटायला येते असे तिने त्याला सांगितल्यावर ये… ये… आता तुरुंग हेच आयुष्य आहे,’ असे तो म्हणाल्याचे बनजोत्स्नाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाले न्यायालय…
– फिर्यादी पक्षाने दिलेले साक्षीपुरावे पाहता, आरोपींचा या प्रकरणातील सहभाग एखाद्या घटनेपुरता किंवा पृत्यापुरता मर्यादित दिसत नाही. नियोजन, संघटन आणि रणनीतीच्या पातळीवरही त्यांचा महत्त्वाचा आणि निर्णायक सहभाग प्रथमदर्शनी दिसतो.
– यूएपीए कायद्यानुसार, खटल्याच्या प्रक्रियेला विलंब हे जामिनाचे कारण ठरू शकत नाही.
– प्रत्येक आरोपीचे पृत्य वेगवेगळे होते. त्यामुळे सर्वांना एकच मापदंड लावण्यात आलेला नाही. प्रत्येकाचा सहभाग स्वतंत्रपणे विचारात घेण्यात आला आहे.



























































