Liquor Policy Case : CM अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला सरेंडर करावं लागणार!

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामिनात आणखी 7 दिवसांची वाढ करावी, अशी विनंती करणारी याचिका मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वतीने करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने CM केजरीवाल यांच्या या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली आहे. यामुळे याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

CM केजरीवाल 1 जूनपर्यंत जामिनावर

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात याचिका करत आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र, न्यायालयाने केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता.