
अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांना सरत्या वर्षी आणखी एक मोठा विजय मिळाला आहे. 2018 मधील एका कोर्टाच्या प्रकरणात मस्क यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. डेलावेअर सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केल्याने मस्क यांना टेस्लाकडून तब्बल 12 लाख कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डेलावेअर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी कनिष्ठ न्यायालयाचा तो निर्णय रद्द केला, ज्यामध्ये मस्कचे 56 अब्ज डॉलरचे नुकसानभरपाई पॅकेज रद्द करण्यात आले होते. टेस्लाच्या शेअर्सची किंमत आता वाढल्याने या पॅकेजची किंमत जवळपास 139 अब्ज डॉलर म्हणजेच 12 लाख कोटी रुपये झाली आहे.
डेलावेअर सुप्रीम कोर्टाने निकाल देताना आपल्या 49 पानांच्या निकालपत्रात नमूद केले की, 2024 च्या सुरुवातीला मस्क यांच्यासाठी पेमेंट पॅकेज पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय अनुचित आणि अन्यायकारक होता. पॅकेज रद्द केल्याने मस्क यांना त्यांच्या सहा वर्षांच्या मेहनतीसाठी कोणतीही भरपाई मिळाली नाही. कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी मस्क यांना जाहीर झालेले पेमेंट अकल्पनीय आहे, असे सांगत भरपाई देण्यास नकार दिला होता.
n 2018 मध्ये टेस्लाच्या बोर्डाने मस्क यांच्यासाठी एका मोठय़ा पॅकेजला मंजुरी दिली होती. टेस्लाने काही उद्दिष्टे साध्य केली तर मस्क यांना सवलतीच्या दरात 3034 दशलक्ष शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय मिळेल, असे म्हटले होते. मस्क यांनी ती उद्दिष्टे साध्य केली, परंतु टेस्लातील काही गुंतवणूकदारांनी याला विरोध करत या निर्णयाविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता, परंतु कनिष्ठ न्यायालयाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे.

























































