
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय 23 ऑगस्टनंतर सुनावणी घेणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा समावेश असलेल्या घटनापीठापुढे राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिकारासंबंधी सुनावणी चालणार आहे. ही सुनावणी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मूळ याचिका व अंतरिम अर्जावर एकत्रित विचार केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे मिंधे गटाची धडधड आणखी वाढली आहे.
मिंधे गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह वापरण्यापासून रोखा, अशी विनंती करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शुक्रवारी शिवसेनेतर्फे वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले. याआधी निश्चित केलेल्या तारखेला घटनापीठ बसणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अॅड. कामत यांनी नवीन तारीख ठरवून लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीची गंभीर दखल खंडपीठाने घेतली आणि घटनापीठापुढील सुनावणी झाल्यानंतर मूळ याचिका व अंतरिम अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंबंधी याचिकेवर सखोल विचार करणार आहोत, असे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी स्पष्ट केले. सुनावणीवेळी शिवसेनेतर्फे अॅड. कामत यांच्यासह अॅड. असीम सरोदे, अॅड. रवी अडसुरे, अॅड. रोहित शर्मा यांनी काम पाहिले. संविधानिक फसवणूक केलेल्या मिंधे गटाचे राजकीय मरण काही दिवस पुढे गेले आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. सरोदे यांनी दिली.