
प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यावर भर दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी खटल्यांच्या सुनावणीबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला. घटनापीठापुढील सर्व खटल्यांची 27 सप्टेंबरपासून लाईव्ह सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह इतर महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी ‘यूटय़ूब’वर लाईव्ह पाहता येणार आहे.
सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये घटनापीठापुढील खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार 27 सप्टेंबरला न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायालयातील सुनावणीचे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ सुरू केले जाणार आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे खंडपीठ दिल्लीच्या प्रशासकीय सेवांवर नेमके नियंत्रण कुणाचे? यासंबंधीत दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल यांच्यातील खटल्याची सुनावणी सुरू करणार आहे. सुरुवातीला ‘यूटय़ूब’वर लाईव्ह टेलिकास्ट केले जाणार असून नंतर सर्वोच्च न्यायालय स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे.

























































