आखातातील युद्ध भडकले! इराण आक्रमक पवित्र्यात, शरणागती पत्करणार नाही; इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये 585 लोकांचा मृत्यू

आखातातील इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला गेला आहे. इराणने मंगळवारी रात्री युद्धाची अधिकृत घोषणा केली आणि इस्रायलने हवाई हल्ल्यांचा सपाटा आणखी तीव्र केला. त्यावर इराणने आक्रमक पवित्रा घेऊन मोठय़ा ताकदीने युद्ध लढण्याची धमक दाखवली. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपावर संतप्त प्रतिक्रिया देतानाच आम्ही कदापि शरणागती पत्करणार नसल्याचा इशारा दिला. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 585 लोकांचा बळी गेला आहे.

खामेनी यांनी मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू करीत असल्याचे अधिकृत घोषित केले. आता युद्ध सुरू होत आहे. आम्ही दहशतवादी इस्रायलला अत्यंत कठोर उत्तर देऊ. त्यांना आता कुठलीही दया दाखवणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत इराणने इस्रायलवर लागोपाठ 25 क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे इस्रायल आणखी पेटून उठला आणि दोन्ही देशांतील युद्ध प्रचंड भडकले. दोन्ही देशांच्या आकाशात क्षेपणास्रांचा मारा सुरू असल्यामुळे धुराचे लोट पसरले आहेत. तसेच सतत स्पह्टांचे आवाज ऐकू येत असल्याने स्थानिक नागरिकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरूच आहे. इराणमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना स्मार्टफोनमधून व्हॉट्सअॅप हटवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मेसेजिंग अॅपद्वारे इराणी नागरिकांची माहिती इस्रायलला पाठवली जात असल्याचा संशय आहे. 13 जून रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आतापर्यंत इस्रायलवर 400 हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सुमारे 1,000 ड्रोन डागले आहेत.

हिंदुस्थानी नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन सिंधू’

युद्धामध्ये मनुष्यहानीसह इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे तिथे राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांच्या कुटुंबांची चिंता वाढली आहे. तेथील हिंदुस्थानी नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले आहे.

खोमेनींचा अमेरिका, इस्रायलला चोख इशारा

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी बुधवारी अमेरिका आणि इस्रायलला चोख इशारा दिला. आम्ही हार मानणार नाही. अमेरिकन सैन्याने इस्रायलविरुद्धच्या युद्धात हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम वाईट होतील, असे खोमेनी यांनी ट्रम्प यांना बजावले. ज्यांना इराणचा इतिहास माहीत आहे, त्यांना चांगलेच माहीत आहे की इराणी लोक कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाहीत. इस्रायलने खूप मोठी चूक केली आहे. त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल, असा गर्भित इशारा खोमेनी यांनी इस्त्रायलला दिला.

फतह-1 क्षेपणास्त्र डागले

इराणने बुधवारी पुन्हा एकदा इस्रायलवरील हल्ले तीव्र केले. इस्रायलच्या अनेक भागांवर इराणने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे वृत्त सरकारी वाहिनीने दिले. यात फतह-1 हे क्षेपणास्त्र इराणने आपल्या भात्यातून काढून डागले आहे. ताशी 6 हजार 100 किमी वेगाने 1400 किलोमीटरवरील लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. अत्याधुनिक डिफेन्स सिस्टीम भेदणारे आणि डागल्यानंतर दिशा बदलता येईल, असे हे क्षेपणास्त्र आहे.

सहा दिवसांचा संघर्ष, 600 हून अधिक मृत्यू

इराण व इस्रायलमध्ये 13 जूनपासून संघर्ष तीव्र झाला आहे. या सहा दिवसांच्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये 600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनच्या एका मानवाधिकार समूहाने केलेल्या दाव्यानुसार, इराणमधील मृतांची संख्या 585 वर गेली आहे, तर तब्बल 1,326 लोक जखमी झाले आहेत. त्याचवेळी इराणने प्रत्युत्तरात केलेल्या हल्ल्यात किमान 24 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.