हिवाळी अधिवेशन – फडणवीस सरकारने महाराष्ट्राचं मिर्झापूर करुन ठेवलंय, सुप्रिया सुळे यांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर नुकतेच भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राचं मिर्झापूर करून ठेवलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी X वरून कॅशकांड समोर आणल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळखळ उडाली आहे. याच मुद्द्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, ‘आतापर्यंत आपण सिनेमात असे नोटांचे गठ्ठे पाहिले होते, तेच आता महाराष्ट्रात पाहावे लागत आहे. हे असे पाहावे लागणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे’.

‘महिन्याभरापूर्वी सरकारमधीलच एका मंत्र्याच्या खोलीतील व्हिडीओ समोर आला होता. त्यावर सरकारने काय अॅक्शन घेतली?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनी नोटबंदी केली, काळापैसा हद्दपार करणार म्हणून नोटबंदीचा निर्णय घेतला. मग महाराष्ट्रात इतक्या नोटा येतात कुठून, याची ED-CBI चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील सुळे यांनी यावेळी केली.

‘महाराष्ट्र सरकारकडे निवडणुकांसाठी पैसे आहेत, वाटायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना द्यायला मात्र पैसा नाही’, असा टोला लगावत त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे. ‘काहीही केलं नाही त्यांच्या मागे ED-CBI लागते. पण हे असे नोटांच्या बंडलांचे व्हिडीओ समोर येऊन त्यांच्यावर काय कारवाई झाली?’, असा प्रश्न सुळे यांनी यावेळी विचारला.

सिनेमातले सीन महाराष्ट्रात वास्तवात!

‘सध्याच्या घडीला सिनेमातले सीन महाराष्ट्रात वास्तवात पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राचा मिर्झापूर करून टाकलेला आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. महाराष्ट्राने कायम समाजहितासाठी दिशा दाखवली आहे’, असेही त्या म्हणाल्या.