
एलपीजी संकटामुळे निर्माण झालेल्या महागाईचा मोठा फटका सुरतमधील कामगारांना बसत असून, अनेक स्थलांतरित कामगारांना कुटुंबासह गावाकडे परतण्याची वेळ आली आहे. रोजगार असूनही वाढलेल्या गॅस दरांमुळे दैनंदिन जगणे कठीण झाल्याचे चित्र दिसत आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
सुरतच्या पांडेसरा भागात राहणारे सुभाष ठाकूर हे मिलमध्ये काम करतात. पत्नी आणि दोन मुलांसह ते भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, त्यांच्या जवळ असलेला 5 किलोचा गॅस सिलिंडर पुन्हा भरून घेणे आता परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. गॅस भरण्यासाठी पूर्वी 500 रुपये लागत होते, मात्र आता त्याच सिलिंडरसाठी 2,500 रुपये मोजावे लागत असल्याने ते शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांनी आपल्या लहान मुलांसह उत्तर प्रदेशातील लखनौ येथील मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी रेल्वेचे तिकीटही काढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरत येथील उधना रेल्वे स्थानकावर स्थलांतरित कामगारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि ओडिशा येथील अनेक कामगार या संकटामुळे आपल्या गावी परतत आहेत. या स्थलांतरामुळे सुरतच्या विस्तीर्ण वस्त्रोद्योगावर परिणाम झाला असून, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक कारखान्यांनी आठवड्यातून एक-दोन दिवस बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे.
सुभाष ठाकूर यांच्यासह त्यांच्या शेजारील अनेक कामगारही रेल्वे स्थानकावर गावाकडे जाण्यासाठी प्रतीक्षा करताना दिसले. कामगारांसाठी चालणारी एक मेसही बंद करण्यात आली आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही संघटनांनी स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी कम्युनिटी किचन सुरू केले आहे. तसेच काही मिल मालकांनीही आपल्या कामगारांना अन्न देण्याची व्यवस्था केली आहे.
दक्षिण गुजरात टेक्सटाइल प्रोसेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष जितुभाई वाखारिया यांनी सांगितले की, एलपीजी संकटामुळे कामगारांसाठी ही अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कामगारांकडे गॅस सिलिंडरचे नोंदणी पुस्तक नसल्याने त्यांना अधिक दराने गॅस घ्यावा लागतो. ते बहुतेक भाड्याच्या घरात राहतात. काही मिल्सना आठवड्यातून एक-दोन दिवस बंद ठेवावे लागत आहे. नवरात्र आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने कारखाने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
अन्नटंचाईवर मात करण्यासाठी पांडेसरा येथे कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले असून, येथे 40 ते 45 रुपयांत एका प्लेटमध्ये जेवण दिले जाते. अनेक मिल मालक हेच अन्न विकत घेऊन आपल्या कामगारांना रात्री 8 वाजता घरी जाताना देतात, जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर येऊ शकतील. या किचनमधून दररोज 5,000 पेक्षा जास्त लोकांसाठी अन्न तयार केले जात असल्याचे वाखारिया यांनी सांगितले.
सुरतमधील मिल मालक राहुल अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या मिलमध्येही स्वयंपाकघरातून 20 रुपयांत जेवण दिले जात आहे. कामगार टिकवून ठेवण्यासाठी ही उपाययोजना केली असून, त्यांच्या मिलमध्ये सध्या मनुष्यबळाची कमतरता नाही आणि उत्पादनही सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर वाढला आहे. कामगार कंत्राटदार कमरान उस्मानी यांनी सांगितले की, परिस्थितीवर मात करण्यासाठी मांडवी (सुरत) येथून लाकडांचे ओंडके आणून कामगारांना स्वयंपाकासाठी दिले जात आहेत. दररोज पाच वाहने लाकडांनी भरून आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
एलपीजी सिलिंडरच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही पावले उचलली आहेत. सुरत शहरात 55 आणि ग्रामीण भागात 20 अशा एकूण 75 गॅस एजन्सींवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते सध्याच्या साठ्याची नोंद ठेवून ग्राहकांना गॅसचा पुरवठा सुरळीत राहील याची खात्री करत आहेत.



























































