
>>सुरेंद्र मुळीक<<
आज 1नोव्हेंबरपासून बदललेल्या नव्या वेळापत्रकानुसार ’तेजस’च्या वेळेत आणि वेगात कोणताही बदल मध्य रेल्वे प्रशासनाने केला नाही. यामुळे ’तेजस’ पुन्हा एकदा चर्चेत आली. ’तेजस’ पहाटे 5 ऐवजी 5.50ला मुंबईतून सोडावी, तिच्या वेगात वाढ करावी आणि पर्यटन जिल्हा असलेल्या सिधुदुर्गातील सावंतवाडी टर्मिनस येथे आणखी एखादा थांबा द्यावा असा सारा प्रस्ताव असूनही तो मंजूर झाला नाही. यामुळे ’तेजस’ पुन्हा एकदा वेळेच्या आणि वेगाच्या बंधनात अडकली गेली. या वेगाच्या बंधनातून तेजस बाहेर आली तरच मेक इन इंडियाची प्रचीती येईल.
कोकण रेल्वे मार्गावर 15 दिवसांपूर्वीच वेगाची चाचणी घेतलेल्या
‘तेजस’ची वेळ बदलेल आणि सिंधुदुर्ग जिह्यात सावंतवाडी टर्मिनस येथे थांबा मिळेल अशी कोकण व उत्तर गोवावासीयांची अपेक्षा होती. परंतु आज 1 नोव्हेंबरपासून नव्याने सुरू होणाऱ्या वेळापत्रकात तेजसच्या वेळेत बदल केला नाही. परिणामी पर्यटनाचा काळ वगळता ही गाडी पुन्हा रिकामीच धावणार आहे.
160 किमीच्या वेगाने धावू शकणारी आणि स्वयंचलित पद्धतीने दरवाजे बंद होणारी अत्याधुनिक यंत्रणेची पहिलीच गाडी भारतीय रेल्वेने मध्य रेल्वे विभागाला दिली आणि मोठय़ा थाटात 23 एप्रिल रोजी सदर गाडी मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पण ‘कावळय़ाकडे दिला कारभार, तेणे हगून भरलो दरबार’ अशी मालवणीत म्हण आहे. ‘तेजस’च्या बाबतीत मध्य रेल्वे प्रशासनाचे नेमके असेच झाले. कारण आयुष्यभर उत्तरेकडे गाडय़ा सोडणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला दक्षिणेकडील भौगोलिक परिस्थिती आणि तिथला बडेजाव ठाऊक नाही. परिणामी ‘तेजस’सारख्या सोन्यासारख्या गाडीचा मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेच्या साथीने अक्षरशः सत्यानाश केला. असे वागण्याची मध्य रेल्वे प्रशासनाची ही पहिलीच वेळ नाही तर यापूर्वीही डबल डेकर या आलिशान गाडीचाही असाच चुथडा केला. गाडी सुटण्याची आणि महाराष्ट्रातील कोकण प्रांतात व गोवा राज्यात पोहचण्याची वेळ याचे तारतम्य मध्य रेल्वे प्रशासनानेच न ठेवल्याने कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या साऱ्याच गाडय़ांचा घोळ झाला. पाच-पाच मिनिटांच्या फरकाने पहाटे 5 ते 5.30 च्या दरम्यान तेजस 13 डब्यांची, जनशताब्दी 13 डब्यांची, डबल डेकर 8 डब्यांची या चेअर कार गाडय़ा सुटतात. त्यातच कमी म्हणून काय सकाळी 6.30 वाजता सुटणारी दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर आणि सकाळी 7 वाजता सुटणारी मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस या गाडय़ा आहेत. म्हणजेच कोकण किंवा गोवापर्यंत जाण्यासाठी दररोज सकाळी किमान 7 हजार प्रवाशांची आवश्यकता आहे. इतके प्रवासी सकाळीच मिळणे शक्य आहे का? कारण या सर्व गाडय़ा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला आणि दिवा येथून सुटतात. यामुळे या गाडय़ांना गाठण्यासाठी मुंबईच्या पश्चिम भागात अंधेरीच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना अशक्यच असते. याचा विचार मध्य रेल्वे प्रशासनाने कधी केला नाहीच, पण कोकणातील राजकीय नेतेही करीत नाहीत. हीच कोकणची खरी शोकांतिका आहे. यामुळेच डबल डेकर गाडी प्रवासीअभावी सायडिंगला काढली गेली होती व आता तेजस या गाडीलाही प्रवासीअभावी सायडिंगला जाण्याची वेळ येणार आहे. कारण आजच्या दिवशी तेजस फक्त सरासरी 50 ते 55 टक्के प्रवासी घेऊन धावत आहे. म्हणजेच उर्वरित गाडी रिकामीच आहे. उद्या हेच कारण पुढे करून मध्य रेल्वे प्रशासन या गाडीला बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
मुळात या गाडीची जी बांधणी झाली ती 160च्या वेगाने धावण्यासाठीच. ही गाडी वेगाने धावणार आणि आतील प्रवाशांना कोणताही धोका होऊ नये म्हणूनच स्वयंचलित पद्धतीने दरवाजे बंद होण्याची सिस्टीम या गाडीला बसविण्यात आली. देशातील ही पहिलीच गाडी असल्याने या गाडीला कुठे चालवावे याबाबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर सदर गाडी मुंबई-गोवा पर्यटन असलेल्या मार्गावर चालविण्याचे ठरविण्यात आले आणि सदर गाडी मध्य रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. परंतु मध्य रेल्वे प्रशासनाने वेळेची आणि वेगाची योग्य ती सांगड घातली नाही. याचे कारण पर्यटन राज्य असलेल्या दक्षिणेकडील प्रवाशांची आणि पर्यटक म्हणून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची मानसिकता ओळखण्यास मध्य रेल्वे प्रशासन कमी पडले. परिणामी सकाळी 5 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या या गाडीला प्रवाशांनी चक्क नाकारले. विशेषतः महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. कारण एवढय़ा पहाटे लहान मुलांना घेऊन येणे शक्यच नाही. त्यातच पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिह्यात या गाडीला केवळ कुडाळ येथे एकच थांबा देण्यात आला. यात सावंतवाडी या स्थानकावर गाडीला थांबा दिला असता तर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तीन सदन तालुक्यांसह उत्तर गोव्यातील प्रवाशांनाही त्याचा फायदा झाला असता. म्हणूनच गाडीचा वेग वाढवून सावंतवाडीत थांबा द्यावा अशी मागणी सातत्याने होत आहे. कोकण रेल्वे प्रशासनानेही अशाच प्रकारची लेखी मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. पण याबाबत कोकणातील राजकीय नेत्यांचे वजन कमी पडले असावे त्यामुळे हा प्रश्न रेल्वे बोर्डाच्या फायलीत तसाच पडून आहे.
वास्तविक कोकण रेल्वेचा मार्ग हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार झाला आहे. या मार्गावर टाकण्यात आलेले रुळ हे 160 किमी वेगाने गाडय़ा धावण्यासाठी सक्षम आहेत. यामुळे तेजस 140 च्या वेगाने पळविणे शक्य होते. परंतु मध्य रेल्वेने या गाडीच्या वेगाची चाचणी न घेता तिला प्रवाशांच्या सेवेत उतरवले आणि अत्याधुनिक तेजसची पॅसेंजर गाडीप्रमाणे अवहेलना केली. यामागे मध्य रेल्वे प्रशासनाचा उद्देश स्पष्ट होता की, सदर गाडी प्रवाशांअभावी बंद करण्याचा डाव. पण गोव्यातील राजकीय दबावामुळे हे प्रकरण अंगलट येताच तब्बल दीड वर्षानी मध्य रेल्वेने तेजसच्या वेगाची चाचणी 15 दिवसांपूर्वीच कोकण रेल्वेच्या नियमांचा भंग करून मान्सून काळात घेतली. या वेगाच्या चाचणीत तेजस फेल गेली. कारण नेहमीच्याच वेळेत तेजस नियोजित करमाळी स्थानकात पोहचली. म्हणजेच तेजस सरासरी 60 किमी वेगाने धावली. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झालेल्या भारतीय रेल्वेची ही परिस्थिती पाहता मेक इन इंडिया म्हणजे काय याची प्रचीती येते. तरीही आम्ही बुलेट ट्रेनच्या गोष्टी करीत आहोत.
प्रवाशांची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेला जागतिक स्तरावर प्रचंड महत्त्व आहे. रेल्वेचा अधिकाधिक वेग वाढवून प्रवाशांना कमीत कमी वेळेत नियोजित स्थानकावर कसे पोहचता येईल याची चाचणी जगात सातत्याने होत असते. रेल्वे सेवेत वेगाने प्रगती करणाऱ्या चीनने अल्पावधीतच प्रचंड आघाडी घेतली आहे. 1997 पासून आतापर्यंत चीनने प्रवासी आणि मालवाहतुकीच्या गाडय़ांच्या वेगात जवळपास दहा वेळापेक्षा अधिक बदल केले आहेत. त्यांनी प्रवासी वाहतुकीचा जास्तीत जास्त वेग 250 ते 300 किमी प्रति तास तर माल वाहतुकीचा वेग 120 ते 140 किमी प्रति तासावर नेला आहे आणि आता तर 375 किमी प्रति तासाची चाचणी सुरू आहे. याउलट भारतीय रेल्वेची स्थिती आहे. प्रवासी रेल्वे गाडय़ांचा वेग वाढविण्यासाठी जून 1972 साली भारतीय रेल्वेने त्यांचा वेग क्षमतेनुसार वर्गवारी जाहीर केली. ‘अ’ मार्ग 160 किमी प्रति तास, ‘ब’ मार्ग 130 किमी, ‘क’ मार्ग 100 किमी आणि ‘ड’ मार्ग 70 किमी प्रति तास अशी योजना होती. पण शताब्दी आणि राजधानीसारख्या सुपरफास्ट गाडय़ांचा वेग आजही 80 किमीच्या आसपास आहे. मागील दोन वर्षांपूर्वी दिल्ली-भोपाळ अशी 150 किमी वेगाने गाडी पळविण्यास सुरुवात केली आहे. अन्यत्र हा वेग घेणे तितकेसे सोपे नाही. कारण गाडीचा वेग हा रुळाच्या वेगाच्या क्षमतेवर अवलंबून असतो. गाडीला वेगाने पळवायचे झाल्यास देशभरात वेगवान क्षमतेचे रुळ टाकण्याची गरज आहे. सुदैवाने कोकण रेल्वेच्या मार्गावर असे वेगवान रुळ आहेत. म्हणूनच 10 वर्षांपूर्वीच कोकण रेल्वेने प्रति तास 130 किमी वेगाने तीन डब्यांची गाडी पळविण्याची चाचणी घेतली आणि अवघ्या चार तासांत गोव्यावरून पनवेल गाठले. त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाली, पण पुढे काहीच झाले नाही. आता तेजसमुळे वेगाच्या चाचणीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. स्वप्ननगरी मुंबई आणि पर्यटन नगरी पणजी या दोन शहरांना जवळ आणणारी ही गाडी होती किंबहुना देशी आणि विदेशी पर्यटकांना वेळेची बचत करून देणारी ही गाडी होती. पण मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या बुरसटलेल्या विचारांमुळे या गाडीचा चुथडा झाला आणि प्रवाशांचा विचका झाला. गाडीची वेळ बदलली नाहीच, पण पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात आणखीन थांबा दिला नाही यामुळे या गाडीने प्रवास करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच या गाडीचा वेग वाढवून मुंबई ते करमाळी हे अंतर 5 ते 6 तासांवर आणावयास हवे. तरच या गाडय़ा भरून धावतील आणि कोकण रेल्वेच्या अत्याधुनिक मार्गाला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा उद्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होताच कोकण रेल्वेला प्रवाशांसाठी कटोरा घेऊन दारोदार फिरावे लागेल.



























































