
गेल्या पाच दिवसांपासून राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिकांचा संप सुरू आहे. या संपाचा फटका रुग्णांना बसत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून नेमकी तारीखही सांगण्यात येत नाही. त्यामुळे रुग्ण वेदनेने विव्हळत बेडवर पडून असल्याचे चित्र आहे. वॉर्डांमध्ये परिचारिकाच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर औषधे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तुटपुंजा पगार आणि पंत्राटी भरतीविरोधात राज्यभरातील 30 हजारांहून अधिक परिचारिका बेमुदत संपावर गेल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून हजारो परिचारिका आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. मुंबईतील 5 हजार परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये शिकाऊ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आल्याने संपाचा रुग्णालयांना फटका बसला नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी परिचारिकांअभावी आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र सगळीकडे असल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयातील परिचारिका रंजना ढोणे यांनी सांगितले. दरम्यान, संपाला राज्य सरकारी गट – ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्रने पाठिंबा दिला आहे.
गावावरून शस्त्रक्रियेसाठी आले अन् अडकून पडले
साताऱयातून आलेल्या नीता चव्हाण या संपामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयात गेल्या 12 दिवसांपासून त्या रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांची सर्व शारीरिक तपासणी, रक्तचाचणी करण्यात आली. त्यांना शस्त्रक्रियेसाठी 18 जुलैची तारीख देण्यात आली होती, परंतु परिचारिकाच उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
राज्यभरात रक्तदान करून आंदोलन
सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. आमचे म्हणणे मांडू दिले नाही, असा आरोप संघटनेच्या सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी केला. सरकारला जाग यावी यासाठी राज्यभरात रक्तदान करून परिचारिकांनी आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, धुळे, लातूर, सोलापूर, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये परिचारिकांचे जोरदार आंदोलन करण्यात आले.