
सूर्या म्हणजे आग ओकणारा फलंदाज… सूर्या म्हणजे 360 डिग्रीमध्ये चेंडू ठोकणारा फलंदाज… सूर्या म्हणजे त्सुनामी… सूर्या म्हणजे गोलंदाजांचा कर्दनकाळ… सूर्या म्हणजे हे, सूर्या म्हणजे ते… जेव्हा सूर्याने ट्वेण्टी-20 क्रिकेटचं जग व्यापलं तेव्हा सारेच त्याच्या प्रेमात पडले होते. ट्वेण्टी-20 क्रिकेटच्या वादळाला हिंदुस्थानी निवड समितीने फार काळ ताटकळत ठेवले नाही. वन डेतही घेतलं आणि कसोटीपटूचा मानही दिला, पण या ट्वेण्टी-20 क्रिकेटच्या झंझावाताची वात वनडेत सारखी विझतेय. त्याने आपल्या चौकार-षटकारांची आतषबाजी दाखवावी म्हणून त्याला वारंवार संधी दिली जातेय, पण तो बाद होतोय. विशेष म्हणजे, तो विकेट फेकत नाहीय, त्याला बाद केले जातेय. जणू त्याला बाद करण्याचा रामबाण चेंडूच गोलंदाजांना सापडला असावा. कोळय़ाच्या जाळय़ात छोटा मासा अडकावा तसा सूर्या सहज फसतोय.
दीड वर्षापूर्वी हिंदुस्थानी क्रिकेटच्या नभांगणात तळपलेला हा सूर्य पाहून साऱयांनीच हळहळ व्यक्त केली होती की, या धडाकेबाज फलंदाजाला हिंदुस्थानी क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी वयाची तिशी का गाठावी लागली? असो, संधी मिळाल्यानंतर भगवान के घर देर है, अंधेर नहीं, असे म्हणत सांत्वन केलं गेलं.
पण आता हा सूर्य काळय़ा ढगांच्या आड झाकोळला गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यांत सूर्याकडून फलंदाजीची अपेक्षा होती, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. सर्वात धक्कादायक म्हणजे, दोन्ही सामन्यांत मिचेल स्टार्कने त्याला पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. दोन्ही सामन्यांत भोपळाही न पह्डल्यामुळे सूर्याच्या फलंदाजीच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
सूर्याला फलंदाजीची करामत दाखवता यावी म्हणून प्रत्येक सामन्यात खेळवले जात आहे, पण सूर्याची बॅटच चालत नाहीये. जेव्हा बॅट चालत नाही तेव्हा डोक्याने खेळायचे असते, पण या यादवाच्या डोक्यात तेसुद्धा घुसत नाहीये. सूर्याने 13 महिन्यांपूर्वी शेवटचे अर्धशतक झळकवले होते. त्यानंतर सलग 16 सामन्यांत त्याला संधी देण्यात आली आणि 16 पैकी 14 सामन्यांत त्याला फलंदाजीही मिळाली, पण एक नाबाद खेळी वगळता उर्वरित 13 डावांत त्याने घोर निराशा केली. सूर्याकडून हिंदुस्थानला खूप अपेक्षा आहेत. आगामी वन डे वर्ल्ड कपच्या संघात त्याला पाहिले जात आहे. त्यासाठी त्याच्या अपयशाकडेही दुर्लक्ष केले जातेय, पण हे फार काळ चालणार नाही. त्याचे अपयश लपवणे आता कठीण आहे. अपयशी सूर्याला वारंवार संधी देणेही चुकीचे आहे. उद्या बुधवारी चेन्नईला त्याच्या बॅटमधून धावांचा वर्षाव व्हायलाच हवा; अन्यथा या सूर्याचा आवाका ट्वेण्टी-20 क्रिकेटपुरताच मर्यादित राहील. त्यामुळे त्याला खेळावेच लागेल. गोलंदाजांना पह्डावेच लागेल. चौकार-षटकारांची आतषबाजी करावीच लागेल.
सूर्यकुमार यादवच्या वन डेतील खेळय़ा
31र, 53,40,39, 34र, 64, 6, 27, 16, 13, 9, 8, 4, 34र, 6, 4, 31, 14, 0, 0.