
सँडटन, दि.15 (वृत्तसंस्था) – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या निर्णायक टी-20 सामन्यामध्ये दुखापत झाल्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवला मैदान सोडावे लागले होते. सूर्याला उचलून मैदानाबाहेर नेल्यामुळे दुखापत गंभीर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मी बरा असून मला व्यवस्थित चालता येत आहे. ही दुखापत फारशी गंभीर नाही, असे सूर्याने सामना संपल्यानंतर स्पष्ट केले आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिला सामना पावसाने झालाच नाही, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे मालिका गमावण्याची टांगती तलवार हिंदुस्थानवर होती. मात्र तिसऱ्या निर्णायक टी-20 सामन्यात कर्णधार सूर्याने दमदार शतकी खेळी करून हिंदुस्थानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सूर्याच्या शतकाच्या जोरावर हिंदुस्थानने आफ्रिकेपुढे विजयासाठी 200 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यामुळे आफ्रिकेचा डाव 95 धावांवर गडगडला.
फलंदाजी झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सूर्याच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. त्याला खांद्यावर उचलून मैदानाच्या बाहेर नेण्यात आले. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती, मात्र सामना संपल्यानंतर झालेल्या संभाषणामध्ये खुद्द सूर्यानेच ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. सूर्या म्हणाला, मी पूर्णपणे बरा आहे. सामन्यामध्ये शतक करणं आणि त्या सामन्यात विजय मिळणं हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.



























































