
>>विद्या कुलकर्णी
सकाळच्या सोन्याच्या किरणांत न्हाऊन त्यांचे चमचमते रंग अजूनच झळाळून उठतात…
दिवाळी हा शरद ऋतूतील सण आहे. पक्षीप्रेमींसाठीही हे दिवस पर्वणीचे असतात. अशा मंगलमय वातावरणात दिव्यांप्रमाणेच चमकणाऱया रंगीत सूर्यपक्ष्यांचा नजराणा सादर करीत आहे !
सूर्यपक्षी शिंजीर
सूर्याचेच वरदान असलेले हे सर्वत्र दिसणारे सूर्यपक्षी खरंच इतर पक्ष्यांपेक्षा वेगळेच आहेत!सूर्यपक्षी ‘नेक्टॅरिनिइडी’ कुळातील छोटे, नाजूक पक्षी असून नराचे रंग धातूंच्या रंगासारखे किंवा इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे चमकतात. चोच लांब, बाकदार व बारीक असून शेपटी लांब असते. जीभ नळीसारखी असून तिचे टोक ब्रशसारखे असते. त्यामुळे फुलातील मधुरस घेता येतो. त्यांचे वास्तव्य पानगळीच्या जंगलात, शेतीच्या प्रदेशात, माळरानात, शहरातल्या बागांमध्ये असते.
सूर्यपक्ष्यांचे खाद्य कोळी, ओकसारख्या वृक्षावरील पांढऱया फळांच्या वेली, फळे, फुलातील मधुरस, द्राक्षे असते. हे पक्षी एका फुलावरून दुसऱया फुलावर एकसारखे भिरभिरत एकटे किंवा जोडीने वावरतात. ‘पावडरपफ’सारख्या फुलांवर ते नाना प्रकारांनी लटकतात व त्यातील मधुरस पितात.
जांभळा सूर्यपक्षी
प्रजननाच्या काळात नर गडद धातूसारखा निळा व जांभळा दिसतो. शेपटीचा वरील भाग काळा व चमकदार निळ्या रंगाचा असतो. मादी पिवळट हिरव्या रंगाची असून खालील बाजूस पिवळ्या रंगाची असते. मादीला फिकट भुवई असून डोळ्यांभोवती काळी पट्टी असते.
छोटा सूर्यपक्षी
प्रजननाच्या काळात नराच्या डोक्यावरील मुकुटाचा रंग इंदधनुष्यातील सप्तरंगांप्रमाणे चमकणारा हिरवा असून चेहऱयाच्या बाजूचा रंग काळसर असतो. वरील पंख व शेपटी काळसर तपकिरी असून त्यावर फिकट जांभळ्या रंगाची तकाकी असते. पंखांवर मखमली लाल रंगाचे आवरण असते. छातीवर लाल रंगाचा पट्टा असतो. गळ्यावर गुलाबी, जांभळा पॅच असतो. पोटाची खालील बाजू पिवळ्या रंगाची असून मध्ये काळ्या रंगाची किनार असते. प्रजननाव्यतिरिक्त नराच्या थोडय़ाच भागावर शेवाळी, पिवळसर, मखमली लाल रंग दिसतो. मादी पिवळट-हिरव्या-तपकिरी रंगाची असून खालील बाजू मात्र लाल रंगाची असते.
लालकेशरी शेपटीचा सूर्यपक्षी
लालकेशरी शेपटीच्या सूर्यपक्ष्याला निसर्गाने अतिशय आकर्षक रंग बहाल केले आहेत. शेपटी लालभडक रंगाची, लांब फितीसारखी असल्यामुळे उठून दिसते. नराचा मुकुट, चेहरा, हनुवटी, गळा गडद जांभळ्या रंगाचा असतो. मान, वरील भाग व डोक्याच्या दोन्ही बाजू लाल रंगाच्या असतात. पाठीवर पिवळ्या रंगाचा पट्टा असतो. पोट व छाती पिवळ्या रंगाची असून त्यावर नारिंगी छटा असते.
काळ्या गळ्याचे सूर्यपक्षी
हे पक्षी प्रामुख्याने गडद काळ्या, किरमिजी, राखाडी – शेवाळी रंगाचे असतात. नराचा मुकुट, मानेच्या वरील भाग, मिशी व लांब शेपटी जांभळट रंगाची असते. गळा, छाती, चेहरा व पंख काळ्या रंगाचे असतात. वरील भाग, मानेच्या व गळ्याच्या बाजूचा रंग किरमिजी असतो. मादी आकाराने नरापेक्षा छोटी असते. पाठीवर पिवळ्या रंगाचा पट्टा असून खालील भाग राखाडी – शेवाळी असतो. बाजूचे पंख पांढरट असून भुवई फिक्कट असते.

























































