सूर्योदय फाऊंडेशन करणार नांदेडला दुष्काळमुक्त, दोन कोटी रुपयांची जलसंधारणाची कामे पूर्ण

40

सामना प्रतिनिधी, नांदेड

ख्यातकीर्त गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने नांदेड जिल्ह्यातील दहा गावे दत्तक घेतली असून, या गावात जलसंधारणाची कामे करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. हा संकल्प जवळ जवळ पूर्ण होत आला असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्यांमध्ये दहा कोटी लिटर्स पाण्याची साठवण होणार आहे तसेच यामुळे दीडशे कोटी लिटर पाणी जमिनीत मुरणार आहे. फाऊंडेशनच्या या प्रकल्पामुळे नांदेड जिल्हा जलयुक्त होण्यास मदत होणार आहे.

सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यांमध्ये सिमेंट बंधारे बांधणे, शेततळी तयार करणे, गाळ काढणे यासारखी कामे करण्यात आली. त्यामुळे बीड जिल्ह्यातील बहुतांश भाग दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. माहूरगडावर आपल्या गायनाची सेवा देण्यासाठी आलेल्या अनुराधा पौडवाल यांनी माहूरगडाजवळील कुंडांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव देवस्थानच्या मंडळींपुढे ठेवला आणि त्यांनी त्यास मान्यता दिली. माहूर येथील मातृतीर्थ ऋणमोचन कुंड यासह अन्य ठिकाणचा गाळ काढण्यात आला. यामुळे तेथील लोकांची तहान भागणार आहे. या कुंडातून एकूण २ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर या कुंडात शंभर कोटी लिटर पाणी साठले जाणार आहे.

जलसंवर्धनासोबतच वृक्ष संवर्धनाचे कामही फाऊंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. माहूरगड परिसरात एक लाख वृक्ष लावण्याचा फाऊंडेशनचा संकल्प असून, त्यादृष्टीने योजना राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या गावांचा विकास होऊन ही गावे जलसंधारणाच्या विकासाची आदर्श बनतील, असा विश्वास डॉ. अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केला. त्यानंतर सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील वडेपुरी, भिलू तांडा यासह दहा गावे दत्तक घेण्यात आली आणि तेथे जलसंधारणाची कामे करण्यात आली. आतापर्यंत फाऊंडेशनने माहेश्वरी महिला मंडळ आणि रेखी परिवार तसेच ऱ्हिदम या स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन आतापर्यंत दोन कोटी रुपयांची कामे केली आहेत. वडेपुरी येथे फाऊंडेशनच्या वतीने खोदकाम करण्यात आले आणि तेथे पाच फुटांवरच पाणी लागले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेततळी, सिमेंटचे बंधारे आदी कामे करण्यात आली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात फाऊंडेशनच्या वतीने शेततळ्याचे मॉडेल तयार करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या