सुशांतचा रूममेट आणि हेल्परचीही चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱया सीबीआयच्या टीमने रविवारी सुशांतच्या वांद्रे येथील फ्लॅटवर जाऊन पाहणी केली. तसेच त्याचा रूममेट सिद्धार्थ पिठानी, खानसामा नीरज सिंह आणि हेल्पर दीपेश सावंत यांनाही सोबत नेत त्यांची कसून चौकशी केली.

सर्वेच्च न्यायालयाने सीबीआयकडे हे प्रकरण सोपविल्यानंतर सीबीआयने एका पाठोपाठ सुशांतच्या जवळच्या व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण करणे सुरूच ठेवले आहे. यापूर्वीही पिठानी, नीरज आणि दीपेश यांची चौकशी झाली आहे. नीरजशी लागोपाठ तिसऱया दिवशी तर पिठानी सोबत लागोपाठ दुसऱया दिवशी चौकशी करण्यात आली. हे तिघे जण घटने दिवशी सुशांतच्या अपार्टमेंटमध्ये उपस्थिती होते.

रिया चक्रवर्तीची लवकरच होणार चौकशी

सुशांतने दोन महिने सुट्टी घालविलेल्या कॉटरस्टोन रिसॉर्टलाही सीबीआयच्या एका टीमने भेट दिली. दोन तास टीमने येथे घालकिले. जेव्हा सुशांत येथे उतरला होता तेव्हा त्याचे वागणे कसे होते याची चौकशी अधिकाऱयांनी येथील स्टाफकडे केल्याचे सांगण्यात येते. सीबीआयची टीम लवकरच सुशांतची गर्लप्रेंड रिया चक्रवर्तीचीही चौकशी करणार आहे. सुशांत, रिया आणि या केसशी जोडल्या गेलेल्या इतर लोकांच्या कॉल डिटेल्सची सुद्धा सीबीआय तपासणी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सीबीआयने शनिवारी सुशांतच्या फ्लॅटमध्ये शनिवारी क्राईम सिन री-क्रिएट केला होता. सुशांतचे पोस्टमार्टेम करणाऱया कूपर रूग्णालयाच्या तीन डॉक्टरांशीही सीबीआयने प्रश्नोत्तरे केली आहेत.