
काँग्रेस पक्षाला गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. त्यावरून पक्षातील काही नेत्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसला ठेच लागली आहे. पक्षात नक्कीच सुधारणा होतील, अस स्पष्ट मत व्यक्त केले
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेला ‘जी-23’ हा गट काँग्रेसविरोधी नाही. पक्षात सुधारणा व्हाव्यात अशीच या गटाची इच्छा आहे. काँग्रेसला ठेच लागली आहे. त्यामुळे पक्ष आवश्यक सुधारणा नक्की करेल. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, ही पक्षातील युवाशक्तीची इच्छा असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये विविध सूर असतात, मतमतांतरं असतात. यातून चर्चा होते आणि मार्ग निघतो. इंदिरा गांधी, नेहरूंच्या काळातही पक्षात दबावगट तयार झाला होता. काँग्रेसमध्ये अशा घटना होतच असतात. पण तो गट काही पक्षाच्या विरोधात नसतो. त्यांच्यासोबत चर्चा होणं गरजेचं असतं. जी-23 प्रकरणही तसंच असल्याच शिंदे म्हणाले.
म्हणून आझाद यांना राज्यसभेची दुसरी टर्म नाही
राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात प्रगल्भ नेत्यांची आवश्यकता असते. त्यामुळेच मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. सगळ्यांना संधी देता यावी यासाठीच गुलाम नबी आझाद यांना दुसरी टर्म दिली गेली नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.




























































