
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हिंदुस्थान आणि अमेरिकेदरम्यानच्या ऐतिहासिक ‘ दोन अधिक दोन’ मंत्र्यांच्या चर्चेदरम्यान पाकिस्तानला खडे बोल सुनावले. सीमेपलीकडील दहशतवादाला पाकिस्तानचे समर्थन असून पाकिस्तानच्या या धोरणाविरुद्ध अमेरिकेने उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे स्वराज यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने ‘लश्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केल्याबद्दलही स्वराज यांनी स्वागत केले. ट्रम्प यांची प्रशंसा करताना स्वराज म्हणाल्या की, हिंदुस्थान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अफगाणधोरणाला पाठिंबा देतो. सीमेपलीकडील दहशतवादाला समर्थन देण्याची पाकिस्तानच्या नीतीचा अंत करणे आणि दक्षिण आशियाई प्रदेशातील दहशतवादाला लगाम रोखणे याबाबतचे ट्रम्प यांचे विचार हिंदुस्थानप्रमाणेच असल्याचे स्वराज म्हणाल्या.
या चर्चेत हिंदुस्थान आणि अमेरिकेदरम्यान ‘कोमाकासा’ हा सुरक्षाविषयक करार करण्यात आला. हा करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच संयक्त दौरा असल्याचे स्वराज यांना यावेळी आवर्जून सांगितले. बैठकीदरम्यान सुरक्षा, परस्पर व्यापारासह विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.
























































