रात्रीच्या अंधारात पाकड्यांची नापाक चाल; शेकडो ड्रोनद्वारे राजौरी, पुंछ, सांबामध्ये घुसखोरीचा प्रयत्न, लष्कर हाय अलर्टवर

जम्मू-कश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हिंदुस्थानने पाकड्यांचे ड्रोन हवेतच नष्ट केले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने एलओसीवर काड्या करण्यास सुरुवात केली असून हिंदुस्थानच्या बाजूला शेकडो ड्रोन्स सोडत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

रविवारी रात्री जम्मू-कश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक ड्रोन्स घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेल्या ड्रोनवर जवानांनी गोळीबार केला. पाकिस्तानधून हे ड्रोन सोडण्यात आल्याचे समोर येताच सांबा, राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजूने एकामागोमाग एक ड्रोन हिंदुस्थानच्या हद्दीकडे येताना दिसले. सांबा, राजौरी आणि पुंछ या तीन जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ हे ड्रोन्स घिरट्या घालताना आढळले. शस्त्रे किंवा अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी हे ड्रोन्स पाठवण्यात आले असावेत असा अंदाज असून त्याच अनुषंगाने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

सुरक्षा दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व ड्रोन्स सीमेपलीकडून हिंदुस्थानच्या हद्दीत शिरले होते. काही वेळ संवेदनशील भागांवर घिरट्या घातल्यानंतर ते ड्रोन्स पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने परतले. या हालचाली लक्षात येताच सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (SOP) लागू करून परिसरातील चौक्यांना सावध केले.

नौशेरा सेक्टरमधील गानिया-कलसियां भागात संध्याकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी ड्रोन दिसताच लष्कराच्या जवानांनी मशीनगनने गोळीबार केला. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या खब्बर (तेरियाथ) भागातही प्रकाशाचा ठिपका दिसला, जो धरमसळ भागातून येऊन भरखच्या दिशेने गायब झाला. रामगड सेक्टरमधील चक बब्राल गावावर रात्री 7 वाजून 15 मिनिटांनी एक ड्रोन काही मिनिटे घिरट्या घालताना दिसला. तसेच मानकोट सेक्टरमध्येही संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी एका ड्रोनची हालचाल टिपण्यात आली.

दोन दिवसांपूर्वीच सापडला होता शस्त्रांचा साठा

काही दिवसांपूर्वीच सांबा जिल्ह्यातील पालुरा गावात पाकिस्तानी ड्रोनने टाकलेला शस्त्रांचा साठा सुरक्षा दलांनी जप्त केला होता. यामध्ये दोन पिस्तुलं, तीन मॅगझिन, 16 काडतुसे आणि एका ग्रेनेडचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री झालेली ड्रोनची घुसखोरी ही सीमाभागात दहशत पसरवण्याचा किंवा दहशतवाद्यांना रसद पुरवण्याचा मोठा कट असल्याचे मानले जात आहे.