प्रभादेवीत आजपासून चढाई-पकडींचा थरार, राज्यातील 18 दिग्गज संघ स्वामी समर्थच्या कबड्डीत भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई कबड्डीची खरी ताकद म्हणजे मंडळे आणि क्लबचे संघ. हेच स्थानिक संघ प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतिचषक निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेनिमित्त आपली ताकद दाखवायला सज्ज होत आहेत. टी-20 वर्ल्ड कपची फटकेबाजी थांबताच सोमवार, 9 मार्चपासून कबड्डीचा चढाई-पकडींचा पाचदिवसीय थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीला कबड्डीच्या पंढरीचे रूप प्राप्त झाले असून यात राज्यातील अव्वल 18 स्थानिक संघांची प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेला ग्लॅमरस करण्यासाठी इंडियन ऑइल, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी, न्यू इंडिया ऍश्युरन्स, आरसीएफ, बँक ऑफ महाराष्ट्र, सारस्वत बँक, मुथूट फायनान्स, आरबीएल बँक आणि बँक ऑफ इंडिया कंपन्यांनी आर्थिक सहकार्य दिले आहे. त्यामुळे मंडळाने राज्यातील एकापेक्षा एक संघांना स्पर्धेत निमंत्रित केले असून मुंबई शहरच्या तगडय़ा 12 संघांसह उपनगर, पुणे, नांदेड, नाशिक आणि रत्नागिरी या जिह्यातील बलाढय़ संघांनाही मॅटवर उतरवले आहे. त्यामुळे या संघांचा ‘दम’दार खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आमदार महेश सावंत यांनी दिली.

प्रो कबड्डीच्या 30 सुपरस्टार्सचीही चढाई

या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्या जोरदार चढाया-पकडींनी कबड्डी चाहत्यांना प्रेमात पाडणारे प्रो कबड्डीचे तब्बल 30 सुपरस्टार  प्रभादेवीच्या मॅटवर आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. यात हिंदुस्थानी रेल्वेचा पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, तसेच मुंबईकर संकेत सावंत, पुणेरी पलटणचा आकाश शिंदे, यू मुंबाचा अजित चव्हाण यांचा समावेश आहे.

कबड्डीचे ग्लॅमर वाढेल असे आयोजन करताना मंडळाने विजेत्या संघाला लक्षाधीश करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपविजेता संघालाही पाऊण लाख आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेले संघही 25 हजार रुपयांची कमाई करणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडा प्रमुख संतोष सावंत यांनी दिली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी घसघशीत रोख पुरस्कार तर चढाई आणि पकडवीरालाही रोख इनाम दिले जाणार आहे.

राजाभाऊ देसाई स्मृतिचषक कबड्डी स्पर्धेत सहभागी संघ

अ गट ः सतेज संघ बाणेर (पुणे), अमर क्रीडा मंडळ (मुंबई), गोल्फादेवी सेवा मंडळ (मुंबई ).

ब गट ः विजय नवनाथ मंडळ (मुंबई ), विजय क्लब (मुंबई), एसएसजी फाऊंडेशन (मुंबई).

क गट ः सिद्धीप्रभा फाऊंडेशन (मुंबई), ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव (नाशिक), अंकुर स्पोर्ट्स क्लब (मुंबई).

ड गट ः वाघजाई क्रीडा मंडळ (रत्नागिरी), विजय भारत क्रीडा मंडळ (मुंबई), शिवनेरी सेवा मंडळ (मुंबई).

इ गट ः स्वस्तिक क्रीडा मंडळ (उपनगर), मिडलाईन ऍकॅडमी (नांदेड), नवोदित संघ (मुंबई).

फ गट ः गुड मार्ंनग स्पोर्ट्स क्लब (मुंबई), भैरवनाथ क्रीडा मंडळ (पुणे), लायन्स स्पोर्ट्स क्लब (मुंबई).