
- स्वप्नाली अभंग
आरोग्याला, पर्यावरणाला घातक म्हणून प्लॅस्टिकच्या नावाने ओरड केली म्हणजे आपण पर्यावरणाप्रति सजग आहोत असं नाही. मुळात प्लॅस्टिक आणि इतर कचरा या समस्येपेक्षा ते आपण कसं, कधी आणि कुठे फेकतोय ही मुख्य समस्या आहे. कचरा तर होणारच, प्लॅस्टिकला अजून तरी पर्याय मिळालेला नाही. जागतिक अर्थकारण, उलाढाल, बाजारपेठ या गोष्टींचा विचार करता आगामी काळात अशक्य असा विविध स्वरूपाचा कचरा निर्माण होतच राहणार आणि त्यात प्लॅस्टिक अग्रस्थानी असेल. म्हणूनच गरज आहे थोडय़ा स्वयंशिस्तीची, जेणे करून निर्माण झालेला प्लॅस्टिकयुक्त कचऱ्यावर पुनर्प्रकिया करणं सोपं होईल.
सतत बदलणारं हवामान आणि जोडीला कोरोनाचे येणारे नवनवीन व्हेरिएंट अशी अगदी alarming suiation असताना काही गोष्टी कळून सवरूनही आपण त्याच त्याच चुका करतोय. इको फ्रेन्डली गोष्टी, प्लॅस्टिक, कचरा याबाबत शहरांमध्ये जागरुक असलेले नागरिक शहराच्या बाहेर पडून मात्र पर्यावरण स्वास्थ्य बिघडवत आहेत असंच म्हणायला हवं.
दोन वर्षांपूर्वी हायवे किंवा घाटरस्ताच्या बाजूचा निसर्ग, डोंगर पाहात प्रवास सुरू व्हायचा, पण आता चित्र बदलतंय. घाटरस्त्यांच्या बाजूला लागलेले कचऱ्याचे ढीग पाहून अस्वस्थ व्हायला होतंय. या ढिगाचे डोंगर होण्यापासून वेळीच रोखलं पाहिजे.
कोराना पश्चात पर्यटनात आमुलाग्र बदल झालाय. सगळ्यांनाच निसर्गाच्या सहवासात जायचं आहे, भरभरून प्राणवायू घ्यायचा आहे, निसर्गाचा आनंद लुटत आलेला ताण झटकायचा आहे, पण हे सगळं करताना भान विसरलेल्या पर्यटकांना आपण काय करतोय हेच कळत नाहीये.
डोंगर, दऱ्या, हिमशिखरं भटकताना मागे ठेवून आलेल्या अस्तित्वाच्या खुणा एक दिवस आपल्यालाच घातक ठरतील हेच त्यांच्या लक्षात येत नाहीये. निसर्गात भटकंती करताना मोकळ्या हवेत, टेकाडय़ा, शेतं, नदी किनारी बसून जेवण्याचा कल वाढला आहे, पण निसर्गाचा मनसोक्त आनंद घेताना खाऊन तिथेच फेकलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या पिशव्या, प्लेटस्, बॉटल्स असा कचरा आता स्थानिकांच्या शेतातही पसरायला लागला आहे आणि ते अधिक धोकादायक आहे.
आरोग्याला, पर्यावरणाला घातक म्हणून प्लॅस्टिकच्या नावाने ओरड केली म्हणजे आपण पर्यावरणाप्रति सजग आहोत असं नाही. मुळात प्लॅस्टिक आणि इतर कचरा या समस्येपेक्षा ते आपण कसं, कधी आणि कुठे फेकतोय ही मुख्य समस्या आहे. हा कचरा योग्य ठिकाणी टाकला गेला तर त्यावर प्रक्रिया करणं सोपं होईल. मुख्य म्हणजे नदी-नाले, समुद्र, डोंगर, दऱ्या प्रदूषित, कुरूप होण्यापासून वाचतील. पशू, पक्षी, जनावरं हा प्लॅस्टिकयुक्त कचरा खाऊन दगावण्याच्या घटनाही कमी होतील.
शहरात अनेक सोसायटय़ांमध्ये ओला-सुका, प्लॅस्टिक, आणि इतर कचऱ्याबाबत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे शहरं तर स्वच्छ होतायेत, पण दिवसेंदिवस ग्रामीण भागातला हा शहरी कचरा वाढत आहे. याला कारण या भागात वाढणारं पर्यटन. आतापर्यंत पर्यटनस्थळं विशेषतः धार्मिक पर्यटनस्थळांपुरतीच हा कचरा मर्यादित होता. या ठिकाणाचं प्लॅस्टिक कचऱ्यावर निर्बंध घालणं किंवा तो टाकण्यासाठी सुनियोजित व्यवस्था करणं शक्य आहे, पण डोंगर, दऱ्या, नद्या जिथं कुणाचंही नियंत्रण नाही अशा ठिकाणी वाढणारा हा कचरा म्हणजे धोक्याची घंटा आहे.
मुंबई पुण्यापासून जवळच असलेला जुन्नर तालुका पर्यटनाचं नवं केद्रं बनलंय, पण पर्यटकांच्या वर्दळीबरोबर येणाऱ्या शहरी कचऱ्याची भेट बदल्यात इथल्या निसर्गाला मिळत आहे. खरं तर निसर्ग संपन्न असा जुन्नर तालुका इथल्या समृद्ध अशा जैवविविधतेला इथं येणाऱ्या पर्यटकांमुळे धोका निर्माण झालाय.
गावांचा विकास साधताना, पर्यटन विकसित करताना या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी स्थानिकांमध्ये जागृती करणं खूप गरजेचं आहे नाहीतर एक दिवस शहरी कचरा हे इथल्या शेतकऱ्यांसाठी, निसर्गासाठी नवं आव्हान ठरेल.
माळशेज घाटाजवळच पिंपळगाव जोगा धरण. निळाशार विस्तीर्ण जलाशय. आता या भागात कॅम्पिंग आणि रिसोर्ट सुरू झाले आहेत. त्याचबरोबर बोट कल्ब सुरू झालेत, पण अगदी दोन-एक वर्षांपूर्वी निसर्ग संपन्न आणि प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या या भागात, धरणाच्या कडेला, भात शेतात शहरी कचरा दिसू लागलाय. धरणाच्या पाण्यातली जैविविधता ही यामुळे धोक्यात आली आहे. याला वेळीच आवर घातला गेला पाहिजे. या भागातील शेतकऱ्यांनी आपला परिसर वाचवण्यासाठी वेळीच पावलं उचलली पाहिजेत.
‘‘पर्यटकांच्या वर्दळीमुळे दुर्मिळ जैवविविधता असलेल्या या भागातील कीटक, प्राणी, पक्षी स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पर्यटन विकास होत असताना इथल्या स्थानिकांमध्ये जागृती निर्माण होणं गरजेचं आहे,’’ असं 2014 पासून या भागात निसर्ग संवर्धनाचं काम करणारे सैन्य दलातील निवृत्त अधिकारी, धामणखेल वन विभागाचे वनरक्षक रमेश खरमाळे म्हणाले. या भागात गाईड म्हणून काम करत असताना खरमाळे पर्यटकांकडून मानधन घेत नाहीत त्याबदल्यात बिया लागवड किंवा जिथं भेट देणार आहे त्या भागातील कचरा वेचण्याचं वचन ते पर्यटकांकडून घेतात. अनेक मोहिमांतून खरमाळे यांनी 60/70 पोती प्लॅस्टिक वेचण्याचं काम केलं आहे त्याबरोबरच 25/30 किलो बियांची लागवडदेखील केली आहे. हे काम एकटय़ा दुकटय़ाचं नसून प्रत्येक गावामधून तरुण स्वयंसेवकांनी पुढे येऊन आपल्या गावचा परिसर स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कचरा तर होणारच, प्लॅस्टिकला अजून तरी पर्याय मिळालेला नाही. जागतिक अर्थकारण, उलाढाल, बाजारपेठ या गोष्टींचा विचार करता आगामी काळात अशक्य असा विविध स्वरूपाचा कचरा निर्माण होतच राहणार आणि त्यात प्लॅस्टिक अग्रस्थानी असेल. म्हणूनच गरज आहे थोडय़ा स्वयंशिस्तीची, जेणे करून निर्माण झालेला प्लॅस्टिकयुक्त कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणं सोपं होईल.



























































