प्रबळगडाची मोहीम फत्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नील साळसकर

ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले मुंबईच्या जवळचे ठिकाण म्हणजे रायगड जिह्यातील प्रबळगड. अलीकडे त्याला मोठय़ा प्रमाणात पसंती मिळू लागली आहे. त्याच्या समोरच उभा ठाकलेला सरळसोट पहाड म्हणजे कलावंती दुर्ग. मागील वेळी एक गड सर केल्यानंतर प्रबळगडाची मोहीम हाती घेतली. मात्र या वेळी सध्याच्या वातावरणाची माहिती नसल्यामुळे उन्हाळय़ातील हा प्रवास चांगलाच कासावीस करणारा ठरला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर वर्षभर शिवप्रेमींसह ट्रेकर्सची मोठी वर्दळ असते. कलावंती दुर्गचे उंच शिखर गाठून परतताना सहा तासांहून अधिक वेळ लागला. रणरणत्या उन्हातील प्रबळगड सर करण्याची मोहीम मात्र कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी आहे. पनवेल तालुक्यातील ठाकूरवाडी गावात गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर चौफेर नजर टाकून आमची पावले हळूहळू पुढे पडू लागली. मुंबईतून येथे पोहोचेपर्यंत सकाळचे 9 वाजले होते. त्या वेळपासून सूर्यकिरणांनी उष्णतेची झलक दाखवायला सुरुवात केली होती. मात्र कलावंती दुर्ग सर करताना राहिलेली ही मोहीम फत्ते करायच्या इराद्याने मी आणि मित्र रोहन जलद रीतीने पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होतो. डोंगरभागात दगडांना ठेचाळत चढताना घामाच्या धारा वाहत होत्या. मधील दोन ते तीन टप्प्यांवर गावकऱयांनी उभारलेल्या स्टॉलवर हलकासा आहार घेतला आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डर देत काहीशी विश्रांती घेतली. काकडी आणि पाण्याच्या बॉटलचा आधार घेत अखेर प्रबळगडाच्या भव्य पठारावर पोहोचलो. त्यावर असणाऱया घनदाट जंगलातील निरव शांतता आणि शीतल हवा जिवाला दिलासा देणारी ठरली.

प्रथम गणेश मंदिरात गणरायाच्या चरणी नतमस्तक होत अनेक वेळानंतरचा थांबा घेतला. मंदिराच्या समोर एक फलक लावण्यात आला असून त्यावर विविध ठिकाणाकडे जाणारे बाण दाखवण्यात आले आहेत. त्या मदतीने मग चालू लागलो. मात्र काही अंतर गेल्यावर दिशादर्शक नव्हते. येथे येणाऱया गिर्यारोहकांनी येणाऱया वाटांवरील झाडांना रिबीन्स बांधून खुणा करण्याचा प्रयत्न केला आहे. गडावर असलेल्या इमारतींचे बांधकाम ढासळले असून त्यांचे अवशेष शिल्लक राहिले आहेत. त्यातही झाडांची मुळे खोलपर्यंत रुजली गेली आहेत. त्यामुळे हा ऐतहासिक ठेवा संवर्धन करण्याची गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवते. गडाच्या कडेवरून माथेरानचा नयनरम्य परिसर पाहता येतो. उत्तर कोकणात आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी टेहळणी बुरुज म्हणून या गडाचा वापर केला जात असे. पश्चिम घाटाच्या सह्याद्री रांगांमध्ये 700 मीटर उंच असलेला हा गड दिमाखात उभा आहे.

दिवसेंदिवस वाट बिकट
एक दिवसाचे पर्यटन आणि जवळचा ट्रेकिंग पॉइंट म्हणून कलावंती दुर्ग आणि प्रबळगडाला मिळणारी पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र प्रबळगडाची वाट दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तटबंदीचे कोसळत असलेले भलेमोठे दगड घसरून पावसाळ्यात वेगाने डोंगर उतारावरून पाण्याबरोबर खाली येत आहेत. यातील काही दगड मध्येच अडकून पडल्यामुळे मधील टप्प्यात चालताना अत्यंत सावधगिरीने पावले टाकावी लागत आहेत. पुरातत्व विभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून गड संवर्धन करावे, अशी मागणी गिर्यारोहकांसह शिवप्रेमींमधून केली जात आहे.