
दहावीच्या सुट्टीत एका मित्राचे ऑडिशन बघायला गेलो. दिवसभर कोपऱ्यात बसून वाट बघताना तिथला एक असिस्टंट डिरेक्टरने स्क्रीप्ट वाचणार का ऑडिशनसाठी विचारले. वाचून दाखवले आणि मित्र राहिला बाजूला माझे सिलेक्शन झाले. एका पासपोर्ट साईजच्या पह्टोवर मला माझे पहिले काम मिळाले आणि हा ठरला आयुष्यातला टर्निंग पॉइंट, पण खरा स्ट्रगल हा पुढे वाट पाहत होता सांगतोय, अभिनेता अमित भानुशाली.
दहावीच्या सुट्टीत डीडीवर ‘अपने अपने सपने’ हा शो सहा महिने केला. थोडा कॉन्फिडन्स वाढला. पण वय कमी असल्याने तेवढे गांभीर्य नव्हते. गमतीत सुरू झालेले काम आयुष्य वेगळय़ा दिशेने नेणार होते, पण तरी मी तितका गंभीर नव्हतो. कला क्षेत्रात यायचे आहे ही जाणीव दहावीनंतर झाली, पण घरून डिग्रीचा अट्टहास होता म्हणून मग इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्यानंतर थिएटरमध्ये डिप्लोमा, हे सगळे करून येईपर्यंत जग 180 कोनात बदलले. इथे होती ती काम मिळवण्यासाठी सुरू असलेली शर्यत. मग मलाही या शर्यतीत उतरावे लागलेच. वर्षभर वणवण फिरलो, घरातून रोज 50 रुपये मिळत होते. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी खूप ताण नव्हता, पण काम मिळत नव्हते त्याचे एक प्रेशर दिवसाअंती जाणवायचे.
साधारण 250 ऑडिशन दिल्या, तंत्र समजून घेतले. मी मुंबईत राहत असलो तरी मूळचा कच्छ इथला आहे. मराठी ऑडिशनसाठी मराठी भाषा अवगत केली, पण तरी कामाचे गणित जुळेना. शेवटी काही हिंदी मालिका सुरू झाल्या, पण 2010 मध्ये आलेल्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतील भूमिका मराठीशी ओळख करून द्यायला कारणीभूत ठरली. श्रीधर पाटील आणि सहकलाकारांनी माझ्या भाषेवर काम केले. उच्चार, व्याकरण, पॉज सगळे शिकवले आणि कला विश्वाचा प्रवास सुरू झाला.
आईची साथ मोलाची
इंजिनीअरिंगनंतर बाबांनी 2 वर्षे दिली. त्यातले एक वर्ष शिकण्यात तर दुसरे स्ट्रगलमध्ये गेले. काहीच होत नाही पाहिल्यावर बाबांनी नोकरी करण्याचा आदेश दिला. तसा मी प्रयत्न केला आणि विप्रो पंपनीचे लेटर बाबांसमोर ठेवले, मात्र मुलगा काही वेगळे करू पाहतोय तर त्याला बळ देऊ अशी भूमिका आईने घेतली. बाबांना समजावले आणि बाबांनी माझ्यासमोर जॉइनिंग लेटर फाडले आणि मला माझ्या आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी खंबीर साथ दिली.
नाटकाचा नव्हे, ऑडिशनचा ग्रूप
या प्रवासात खूप मित्र भेटले. आमचा 22 जणांचा ग्रुप होता. अंधेरी स्टेशनबाहेर आम्ही रोज 11 वाजता ऑडिशनला जाण्यासाठी एकत्र भेटायचो आणि प्रत्येक ठिकाणी ही टोळी पोहचायची. नवीन काम मिळण्यासाठी आम्ही कायम ‘साथी हात बढाना’ असे म्हणत एकत्र प्रयत्न करायचो. आज यापैकी मी एकटाच या क्षेत्रात आहे, बाकी सगळे मित्र वेगवेगळय़ा ठिकाणी सेटल झाले आहेत.
>> स्वरा सावंत
























































