नांदेडमध्ये अवतरणार ‘स्वरगंगा’, कानसेनांसाठी पर्वणी

अरूण दाते

सामना प्रतिनिधी । नांदेड

मराठी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक स्व. अरुण दाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि.१० ऑगस्ट रोजी त्यांनी गायिलेल्या निवडक गितांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली आहे. प्रख्यात निवेदक अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे यांच्या संकल्पनेतून आणि निर्मितीतून साकार होणाऱ्या ‘स्वरगंगा’ या स्व.अरुण दाते यांनी गायलेल्या गाण्याची मैफल सायंकाळी साडेसहा वाजता कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक गौरव सोहळा समितीने पुढाकार घेतला आहे.

मराठीतील प्रख्यात भावगितांचा गायक ज्यांची गिते मराठी रसिकांच्या आजही ओठांवर आहेत, अशा स्व.अरुण दाते यांच्या स्मृती जागविण्यासाठी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याचे प्रमोद रानडे, नांदेडचे संजय जोशी, औरंगाबादच्या संगीता भावसार आणि गिरीश धुंदे यांनी गायिलेल्या विविध गितांचा यात समावेश असणार आहे. अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांची निर्मिती, दिग्दर्शन आणि निवेदन असून, त्यांना औरंगाबादच्या सौ.माधुरी लासूरकर यांचे सहनिवेदन असणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रमोद देशपांडे आणि सौ.मंजुषा देशपांडे यांचे असून, या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन हे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे व मैफिलीचे आयोजन करणाऱ्या विजय जोशी यांचे आहे. तर निर्मिती सहाय्यची भूमिका विजय बंडेवार आणि गोविंद पुराणिक यांची आहे. डॉ.प्रसाद जोशी व रागिनी जोशी यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले आहे. कार्यक्रमाची प्रकाश योजना दिपक मुळेची असून, ध्वनी व्यवस्था औरंगाबादच्या आनंद जोशी यांची आहे. मराठवाड्यातील गाजलेल्या कलावंतांची यात संगीत साथ असणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी हे करणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे राहणार आहेत. तर अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.मिलिंद एकताटे, अ‍ॅड.उदय निंबाळकर, वरिष्ठ लेखाधिकारी नीळकंठ पाचंगे, राम तुप्तेवार, दत्तात्रय पवार पाटील, आयआयबीचे दशरथ पाटील आणि शिरीष नागापूरकर यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे. यावेळी अशोक तेरकर, डॉ.हंसराज वैद्य, अ‍ॅड.व्यंकटेश पाटनूरकर यांचा विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.