तिकीटासाठी नवरा बायकोत तुंबळ संघर्ष, भाजपच्या माजी मंत्री नवऱ्यापासून वेगळ्या होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामान्य गृहिणी ते आमदार आणि आमदार ते मंत्री असा प्रवास अत्यंत वेगाने करणाऱ्या स्वाती सिंह या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाती सिंह आणि त्यांच्या नवऱ्याने एकाच मतदारसंघातून भाजपकडे तिकीट मागितलं होतं. त्यांच्या वादामुळे भाजपने सरोजिनीनगर मतदारसंघातून तिसऱ्याच उमेदवाराला उभं केलं होतं. निकाल लागून सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर स्वाती सिंह आणि त्यांचा नवरा दयाशंकर सिंह यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. स्वाती सिंह यांनी दयाशंकर सिंह यांच्याविरोधात दाखल केलेला घटस्फोटाचा खटला पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

2008 साली स्वाती सिंह आणि त्यांचा नवरा दयाशंकर सिंह यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली होती. नवरा-बायकोचं नातं इतकं ताणलं गेलं होतं की दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 2012 साली त्यांनी लखनऊ न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. हे प्रकरण प्रलंबित असतानाच दयाशंकर सिंह यांनी मायावती यांच्याविरोधात एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा भाजपला मोठा तोटा झाला होता. भाजपने दयाशंकर यांची तातडीने पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली होती.

मायावती यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेमुळे बिथललेल्या बसपाच्या नेत्यांनी स्वाती सिंह आणि त्यांच्या मुलीविरोधात आक्षेपार्ह टीका करायला सुरुवात केली होती. यामुळे संतापलेल्या स्वाती सिंह यांनी या टीकाकारांविरोधात टीकास्त्रांची मालिका सुरू केली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप प्रभावित झाला होता. त्यांची फायरब्रँड छबी आपल्या कामी पडू शकते हे ओळखून भाजपने स्वाती सिंह यांना महिला मोर्चाच्या अध्यक्षा बनविले. यानंतर, 30 वर्ष ज्या मतदारसंघातून भाजपला विजय मिळाला नव्हता त्या सरोजिनीनगर मतदारसंघातून स्वाती यांना उमेदवारी देण्यात आली. स्वाती यांनी इथे विजय मिळवत विधानसभा गाठली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं. मंत्री झाल्यानंतर स्वाती सिंह यांनी दयाशंकर सिंह यांच्यापासून घटस्फोटाचं प्रकरण बंद करून टाकलं होतं. हे बंद प्रकरण पुन्हा सुरू करण्यासाठी स्वाती सिंह यांनी सोमवारी न्यायालय गाठलं होतं.