सफाई कामगार पदासाठी 7 हजार पदवीधर, इंजिनीअर तरुणांचे अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोईम्बतूर महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या जागांसाठी इंजिनीअर, पदवीधर तसेच डिप्लोमा केलेल्या 7 हजार तरुणांचे अर्ज आले आहेत. ग्रेड-1 साठी ही भरती होणार आहे. कोईम्बतूर महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या 549 जागांसाठी अर्ज मागवले होते. बुधवारी अधिकाऱ्यांनी उमेदवारांची मुलाखत घेतली, तसेच कागदपत्रांची छाननी केली असून यावेळी सात हजार जण उपस्थित होते. सफाई कर्मचाऱ्यांच्या पदासाठी आलेल्या अर्जात 70 टक्के उमेदवार पात्रतेत बसणारे असून अनेकजण इंजिनीअर, पदव्युत्तर, पदवीधर आणि डिप्लेमा पूर्ण केलेले आहेत. अर्ज केलेल्यांपैकी अनेक उमेदवार आधीच खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करीत असल्याचे आढळून आले, मात्र सरकारी नोकरी आणि 15,700 रुपये पगार असल्याने अनेकांनी आपण इच्छुक असल्याचे सांगितले.

अनेक पदवीधर तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळालेली नाही. कुटुंबाला आर्थिक पाठिंबा म्हणून सहा ते सात हजारांमध्ये खासगी कंपन्यांमध्ये तरुणांना नोकरी करावी लागत आहे. या कंपन्यांमध्ये 12 तास नोकरी करूनही नोकरी टिकेल की नाही याची शाश्वती त्यांना नाही.सफाई कर्मचाऱ्याच्या नोकरीत सुमारे 20 हजार रुपये पगार आहे. कामाची वेळ सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास अशी आहे. मधल्या काळात इतर कामे करण्याची मुभाही त्यांना आहे. सध्या कोईम्बतूर महापालिकेत दोन हजार कायमस्वरूपी तर 500 कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत.