इंग्रजी, गणितासह नऊ विषयांसाठी पुढील वर्षीपासून नवा अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी नऊ विषयांच्या अभ्यासक्रमात पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र आदी विषयांचा त्यात समावेश आहे. विषयवार तज्ञ समित्या नेमून त्या विषयांचा आढावा घेण्याचे निर्देश यूजीसीने मुंबई विद्यापीठासह देशातील सर्व विद्यापीठांना दिले होते. आता त्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना यूजीसीने दिल्या आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधन संस्थांच्या संचालकांची एक राष्ट्रीय परिषद गेल्या जुलैअखेरीस आयोजित केली होती. त्यात उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासंदर्भात चर्चा झाली आणि त्यासाठी काही ठरावीक विषयांच्या अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्याबाबत एकमत झाले होते. विद्यार्थी ते विषय आवडीने शिकतील असे सद्यस्थितीला साजेसे अभ्यासक्रम असावेत असे मत त्यात मांडले गेले होते.

सुधारणा करण्यापूर्वी अभ्यासक्रमांचा आढावा घेतला गेला. त्यासाठी संबंधित विषयांतील तज्ञांच्या समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्या समित्यांनी देशभरातील विद्यापीठांमध्ये शिकवल्या जाणार्‍या अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती घेतली. संबंधित क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली आणि कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये काय बदल केले पाहिजेत याबद्दल शिफारशी केल्या.

इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, मानवाधिकार, वनस्पतीशास्त्र, ग्रंथालय शास्त्र, गुन्हेगारी शास्त्र या विषयांचा अभ्यासक्रम बदलणार आहे.