तुर्कस्तान आणि अमेरिकेत का वाढला तणाव? वाचा सविस्तर

869

काही वर्षांपासून युद्धभूमी बनलेल्या सीरियामध्ये काही प्रमाणात शांतता प्रस्थापित झाल्यानंतर अमेरिकेने ईशान्य सीरियामधून सैन्य माघारी बोलावले. मात्र अमेरिकेचे सैन्य माघारी फिरताच सीरियाच्या शेजारी तुर्कस्तान सीरियावर हल्ले सुरू केले आणि पुन्हा एकदा सीरियाला युद्धभूमीचे स्वरुप आले. तुर्कस्तानने केलेल्या हल्ल्यांमुळे आता अमेरिका आणि तुर्कस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

सीरियात सुरू असलेले हल्ले तातडीने थांबवावे अशी मागणी अमेरिकेने केली होती. परंतु तुर्कस्तानने या मागणीला केराची टोपली दाखवली. तसेच जोपर्यंत आपले ‘सेफ झोन’ बनवण्याचे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवली. ईशान्या सीरियाच्या भागात सेफ झोन निर्माण करण्यासाठी आपण सीरिया आणि तुर्कस्थान यांच्याशिवाय कुणालाही मध्यस्थी म्हणून स्वीकारणार नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तुर्कस्तान आपल्या सीमे लगत असलेल्या सीरियाच्या भागातील कुर्द सैन्याला आणि नागरिकांना तेथून मागे हटणवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी तुर्कस्तानकडून 32 किमीपर्यंत एक सेफ झोन बनवण्यात येत आहे. परंतु कुर्दांना तुर्कस्तानची ही भूमिका मान्य नाही. ही आपली भूमी असून तुर्कस्तानचा हस्तक्षेप इथे चालणार नाही, अशी भूमिका कुर्दांची आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी स्थिती चिघळली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले सैन्य माघारी बोलवण्याच्या निर्णयाला टीका करणाऱ्यांना उत्तर दिले असून सरकारची भूमिका स्पष्ट केली. सीरियात शांतता प्रस्थापित केल्यानंतर अमेरिकी सैन्य माघारी बोलावले. सीरियात इसिसच्या विरोधात लढताना कुर्दांनी अमेरिकेच्या सैन्याला समर्थन दिले होते. त्याबदल्यात अमेरिकेन कुर्दांना मोठ्या प्रमाणावर पैसे दिले. ती त्यांची भूमी आहे. त्यामुळे अमेरिकी सैन्य परत बोलावले, असे स्पष्ट करण्यात आले.

तसेच तुर्कस्तानने देखील तत्काळ हल्ले थांबवावे अन्यथा अमेरिका त्यांच्यावर निर्बंध आणेल, असा इशारा दिला. मात्र तुर्कस्तान आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी हल्ले सुरूच ठेवले आहेत. कुर्द शस्त्र खाली ठेवून ती जागा सोडत नाही तोपर्यंत आम्ही हल्ले थांबवणार नाही, असे त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अमेरिका आणि तुर्कस्तानचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे एक प्रतिनिधी मंडळ लवकरच तुर्कस्तानच्या सरकारसोबत चर्चा करण्यासाठी लवकरच रवाना होणार आहे. तुर्कस्तानने हल्लेल थांबवण्यासाठी अमेरिकेचा हा आणखी एक प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या