आता टी-20 वर्ल्ड कप यूएईमध्ये होणार? ‘बीसीसीआय’नेही घेतली कोरोनाची धास्ती

हिंदुस्थानात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने बायो-बबलचे चक्र भेदून अखेर आयपीएलचे 14 वे पर्व बंद पाडले. सहा महिन्यांनंतर हिंदुस्थानात टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे. ‘आयसीसी’ची ही स्पर्धा मायदेशात घेण्याचा ‘बीसीसीआय’चा निर्धार होता. मात्र, कोरोनाने बायो-बबलचा फुगा पह्डल्यामुळे आता ‘बीसीसीआय’नेही या महामारीची धास्ती घेतली आहे.

त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप ‘बीसीसीआय’ला यूएईमध्येच स्थलांतरीत करावा लागणार असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या संकटातही ‘आयपीएल’ स्पर्धा यशस्वी झाली असती तर सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-20 वर्ल्ड कपचे मायदेशात आयोजन करण्यासाठी ‘बीसीसीआय’चा आत्मविश्वास वाढला असता. मात्र, अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ व ग्राऊंडस्मन यांना कोरोनाची लागण झाल्याने 29 सामन्यांनंतर ‘आयपीएल’ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदुस्थानात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यासाठी ‘बीसीसीआय’ने देखील आता कच खाल्ली असणार. सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेत 16 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट लवकर आटोक्यात आली नाही तर परदेशी संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानात येण्यास धजावणार नाहीत याचा अंदाज ‘बीसीसीआय’ला आला आहे. त्यामुळे त्यांनी पेंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून हा टी-20 वर्ल्ड कप यूएईमध्ये आयोजित करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

आयोजक हिंदुस्थानच, पण वर्ल्ड कप परदेशात

कोरोनामुळे ‘आयपीएल’चे 14 वे सत्र चार आठवडय़ांत बंद पडणे याचा अर्थ हिंदुस्थानची आरोग्य व्यवस्था सध्या संकटात आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत मायदेशात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करणे नक्कीच सुरक्षित नसेल. त्यातच हिंदुस्थानात नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप यूएईमध्ये आयोजित करण्याची तयारीदेखील सुरू केली असल्याची माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

जूनमध्ये ‘आयसीसी’ची बैठक

कोरोना महामारी आटोक्यात आली नाही तर पुढील सहा महिन्यांपर्यंत कोणीही हिंदुस्थान दौऱयावर येण्यास धजावणार नाही. त्यातच कोरोनाच्या तिसऱया लाटेचे संकेत मिळाल्याने ‘बीसीसीआय’ला नाइलाजाने यूएईमध्येच टी-20 वर्ल्ड कप स्थलांतरीत करावा लागेल. त्यातच कोरोनामुळे आयपीएल स्पर्धाही थांबवावी लागल्याने ‘बीसीसीआय’ टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी धोका पत्करण्याची चूक करणार नाही. त्यामुळे जूनमध्ये होणाऱया ‘आयसीसी’च्या बैठकीत टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या