
ICC T20 World Cup चा थरार आता अधिक रंगतदार होणार आहे. 21 फेब्रुवारी पासून सुपर-8 च्या लढतींच घमासान युद्ध सुरू होईल. टीम इंडियाचा पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. साखळी फेरीत टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. काही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली तर काही खेळाडूंचा खेळ अगदीच सुमार राहिला. त्यामुळे सुपर 8 साठी टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
साखळी फेरीमध्ये सलामीवीर इशान किशनने फलंदाजी करताना गोलंदाजांना खरपूस समाचार घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅटही तळपली आणि शिवम दुबेनेही आक्रमक पवित्रा घेत धावा कुटून काढल्या. मात्र, ज्या फलंदाजाकडून संघाला सर्वाधिक अपेक्षा होती, त्याने मात्र निराश केलं. अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यांमध्ये शुन्यावर बाद झाल. त्यामुळे सुपर 8 साठी अभिषेक शर्माचा पत्ता कट होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे टीम इंडियामध्ये वॉशिंगटन सुंदरच्या येण्याने फिरकी गोलंदाजासह फलंदाजाचा एक पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे रिंकू सिंहला आपली जागा खाली करावी लागू शकते. कारण रिंकू सिंह सारखी ताबडतोड फटकेबाजी करण्याची क्षमता वॉशिंग्टन सुंदरकडेकही आहे.
अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंह यांच्याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल होती. त्यामुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं होतं. त्याच्याजागी कुलदीप यादवला खेळवण्यात आलं होतं. टीम इंडियाचा सुपर 8 चा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे, ज्याची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल आहे. त्यामुळे अर्शदिप सिंगला संघात जागा मिळणार का? हे पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.



























































