
ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणारा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येईल हे निश्चित आहे. मात्र आयसीसीकडून याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. उद्या टी-20 वर्ल्ड कपबाबतचा अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यास बीसीसीआयचा आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे यावेळी आवश्यक ठरणार आहे.
कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येईल हे निश्चित असले तरी ही स्पर्धा केव्हा होईल याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. हिंदुस्थानात 2021 सालामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. तसेच हिंदुस्थानातच 2023 सालामध्ये वन-डे वर्ल्ड कप पार पडणार आहे. त्यामुळे आयसीसीकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2022 सालात आयोजनासाठी परवानगी मिळू शकते. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पुढल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपचा हट्ट धरल्यास हिंदुस्थानातील टी-20 वर्ल्ड कप 2022 सालामध्ये ढकलण्यात येऊ शकतो.
मोर्चेबांधणी
बीसीसीआयने आतापासूनच आयपीएलची मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलीय. यूएईत ही स्पर्धा खेळवण्याची जय्यत तयारीही सुरू झालीय. संघ फ्रेंचायझींनी खेळाडू व सपोर्ट स्टाफसाठी चार्टर्ड विमानाची सोयसुद्धा केलीय. टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलल्यास आणि केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यास बीसीसीआय ही स्पर्धा खेळवू शकते. मात्र आयपीएलचे वेळापत्रक, खेळाडूंची सुरक्षा, क्वारंटाईनचा कालावधी यांसारख्या छोट्या छोट्या बाबींवरही बीसीसीआयला मेहनत घ्यावी लागणार आहे.





























































