
यूएईमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी ओमानचा संघ सराव लढती खेळणार आहे. ओमानचा संघ मुंबईशी तीन टी-20 व तीन वन डे लढती खेळून टी-20 वर्ल्ड कपचा सराव करवून घेणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली असून डावखुरा गोलंदाज शम्स मुलानीकडे या संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
एमसीएकडून वेबसाईटवर संघ जाहीर केलेला आहे. ओमानविरुद्धच्या लढतीसाठी मुंबईचा 14 जणांचा चमू घोषित करण्यात आलेला आहे. शिवम दुबे व यशस्वी जैसवाल या दोन्ही खेळाडूंचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आलेला आहे. शिवम दुबे याने हिंदुस्थानसाठी एक वन डे व 13 टी-20 लढती खेळल्या आहेत. तसेच यशस्वी जैसवाल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो.
19 ऑगस्टला पोहोचणार
ओमानकडून एमसीएला मालिकेसाठी आमंत्रण देण्यात आले होते. एमसीएकडून ते स्वीकारण्यात आले. आता मुंबईचा संघ 19 ऑगस्टला ओमानला पोहोचणार आहे. क्रिकेट मालिका आटपून मुंबईचा संघ 3 सप्टेंबर रोजी मायदेशी परतेल. दरम्यान, अमोल मुजुमदार याच्याकडे मुंबई संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.
मुंबईचा संघ खालीलप्रमाणे
शम्स मुलानी (कर्णधार), आकर्षित गोमेल, हार्दिक तामोरे, अरमान जाफर, चिन्मय सुतार, शिवम दुबे, अमन खान, सुजीत नायक, यशस्वी जैसवाल, शशांक अतार्डे, मोहित अवस्थी, साईराज पाटील, दीपक शेट्टी व ध्रुमील मटकर.



























































