
T20 विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवांमुळे हिंदुस्थानचे स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात आले आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी हिंदुस्थानी संघाला अफगाणिस्तानच्या जय पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे. अफगाणिस्तानचा मुकाबला हा न्यूझीलंडशी होणार असून, न्यूझीलंडचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. अफगाणिस्तान न्यूझीलंडच्या संघावर विजय मिळवेल याची शक्यता ही फार कमी आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं आणि हिंदुस्थानी संघाचे पाठीराखे हाच विचार करत टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान कायम राहील यासाठी प्रार्थना करत आहेत.
नामिबियाचा संघ स्पर्धेतून बाद
न्यूझीलंडने सुपर-12 मुकाबल्यामध्ये नामिबियाच्या संघाला 52 धावांनी पराभूत केलं. 4 पैकी 3 सामने हरल्याने नामिबियाचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. न्यूझीलंडचा पुढचा सामना अफगाणिस्तानशी होणार असून या सामन्यात अफगाणिस्तानचा जिंकला आणि हिंदुस्थानला नामिबियाविरूद्ध मोठा विजय मिळवता आला तरच हिंदुस्थानी संघ या स्पर्धेत टीकून राहू शकेल. न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तानविरूद्ध जिंकला तर तो पाकिस्तानसोबत उपांत्यफेरीत पोहोचेल.
स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यात जाडेजाची जबरदस्त कामिगिरी
जर अफगाणिस्तान न्यूझीलंडविरूद्धचा सामना जिंकू शकला नाही तर हिंदुस्थानी संघाचे काय होईल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हाच प्रश्न संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याला विचारण्यात आला. स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यात केलेल्या कामगिरीबद्दल जाडेजा याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी जाडेजा याला अफगाणिस्तानचा जिंकला नाही तर काय असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना जाडेजा म्हणाला की ‘बॅग पॅक करून घरी जाऊ’. स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यात हिंदुस्थानी संघाने उत्तम कामगिरी केली. स्कॉटलंडच्या संघाला अवघ्या 85 धावांत गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानी संघाने हे आव्हान 6.3 षटकांतच पूर्ण केले. के.एल.राहुलने फक्त 18 चेंडूत अर्धशतक झळकावले.