
ऑस्ट्रेलियामध्ये T20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. 23 तारखेला या स्पर्धेतील सर्वात उत्कंठावर्धक सामना होणार आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन संघ भिडणार असून या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघासाठी एक चिंतेची बातमी आहे. पाकिस्तानी फलंदाज शान मसूद याच्या डोक्यावर बॉल आदळला आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची जखम किती गंभीर आहे हे डॉक्टर पाहात आहेत.
मेलबर्न मैदानात पाकिस्तानी संघ सराव करत होता. मोहम्मद नवाझच्या गोलंदाजीवर शान मसूद फलंदाजीचा सराव करत होता. यावेळी मोहम्मदचा एक चेंडू शानच्या डोक्यावर आदळला, ज्यामुळे तो मैदानातच कोसळला होता. ते पाहून सगळे पाकिस्तानी क्रिकेटपटू घाबरले आहेत. शान याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर त्याला झालेली इजा किती गंभीर स्वरुपाची आहे हे तपासत आहेत.




























































