
प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची आयकर विभागाने 38 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली आहे. 300 कोटी रुपयांच्या रकमेबाबत उत्तरे मिळाली नाहीत. तसेच 350 कोटी रुपयांच्या टॅक्समध्ये गडबड झाल्याचा दावा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थात सीबीडीटीने केला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या धोरणांविरुद्ध बोलणाऱ्या-लिहिणाऱ्या कलाकार, निर्माता-दिग्दर्शकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याची टीका सर्वत्र होत आहे.
अनुराग कश्यप, तपासी पन्नूसह विक्रमादित्य मोटवाणी, निर्माता विकास बहल, मधु मंटेना, रिलायन्स एंटरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ शिभाशीष सरकार, एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या काही अधिकाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले. मुंबई, पुण्यातील 28 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरू आहे. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे चित्रपटांच्या शूटिंगसाठी पुण्यात आहेत. त्यांची पुण्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 38 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली आहे.
‘फॅण्टम फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसने बॉक्स हाऊस कलेक्शनपेक्षा उत्पन्न कमी दाखविले आहे. यात 300 कोटींची गडबड झाल्याचे दिसत आहे. याबाबत कश्यप आणि तापसी पन्नू समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत.
‘सीबीडीटी’ने काय म्हटले आहे?
- प्रॉडक्शन हाऊसने शेअर ट्रान्झेक्शनमध्ये शेअर्सचे अंडर व्हॅल्युवेशन केले.
- यात ट्रॅक्समध्ये 350 कोटी रुपयांची गडबड झाल्याचे दिसत आहे.
- तापसी पन्नूकडे पाच कोटी रुपयांच्या कॅश देवाण-घेवाणीच्या पावत्या मिळाल्या.
- 20 कोटी रुपयांच्या बोगस देवाण-घेवाणाची माहिती मिळाली आहे.
- लॅपटॉपसह अनेक कागदपत्रे जप्त केली असून तपास सुरू आहे.
































































