
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही काळापासून या मालिकेत गळती सुरू झाली आहे. आता या मालिकेच्या दिग्दर्शकाने मालिकेला रामराम ठोकल्याची माहिती मिळत आहे.
छोट्या पडद्यावर 2008पासून ही मालिका दाखवली जात आहे. मध्यम वर्गाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित हलक्याफुलक्या कौटुंबिक विनोदासाठी ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. काही वर्षं छोट्या पडद्यावर गाजलेल्या या मालिकेमागे गेल्या काही काळापासून अडचणींचा ससेमिरा सुरू झाला.
आधी या मालिकेत दया भाभीच्या मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री दिशा वकानी हिने बाळंतपणासाठी कार्यक्रमातून अल्पविराम घेतला. मात्र, तो अल्पविराम इतका लांबला की आता तिच्या परतीचे मार्ग बंद झाले आहेत. त्यानंतर टप्पूच्या भूमिकेत असलेले भव्य गांधी आणि नंतर राज अनाडकट या दोन्ही अभिनेत्यांनी मालिका सोडली.
या धक्क्यातून सावरत नाहीत तोच मालिकेत तारक मेहताच्या भूमिकेत असणाऱ्या शैलेश लोढा यांनीही मालिका सोडली. त्यांच्या ऐवजी अभिनेता सचिन श्रॉफ याने ही भूमिका स्वीकारली. पण, आता या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी या मालिकेला रामराम ठोकला आहे.
राजदा हे गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेचं दिग्दर्शन करत होते. त्यांनी 15 डिसेंबर रोजी या मालिकेच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी मालिका सोडली, अशी माहिती मिळत आहे. राजदा आणि निर्मात्यांमध्ये काही मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे राजदा यांनी अशा प्रकारे कोणतेही मतभेद झाले नसल्याचं म्हटलं आहे.


























































