
उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत या जिल्ह्यात 86 जण कोरोनाबाधित असल्याचं आढळलं असून गेल्या चोवीस तासातच 35 रुग्णांची वाढ झाली आहे. यातले बहुतांश रुग्ण हे दारुल उलुम देवबंद येथील असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, दारुल उलुम देवबंद तसेच दारुल उलुम वक्फ येथील वसतीगृहांमध्ये सध्या एकूण पाच हजार विद्यार्थी आहेत. सुरुवातीला येथील एक विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता. त्याच्यासोबत राहणाऱ्या सहकाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे वसतिगृहात एकच गहजब उडाला होता. आता देवबंदमधील 35 जण कोरोनाबाधित असल्याचे अहवाल आले आहेत. या अहवालांमुळे एकच गहजब उडाला असून हा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
देवबंदमध्ये कोरोनाचं संक्रमण होण्यामागे तबलिगी असल्याचंही वृत्त आहे. तबलिगी जमातचे सुमारे 250 जण वेगवेगळ्या गटांनी दिल्लीतील मरकज संपवून देवबंद येथे आले होते. यात इंडोनेशिया, मुंबई, दिल्ली आणि गुजरात येथून आलेले सर्वाधिक होते. तसेच ते तिथल्या मशिदींमध्ये राहिले होते. या तबलिगींपैकी 47 जण कोरोनाग्रस्त असल्याचे अहवाल आले होते. त्यामुळे देवबंद येथील संक्रमण हे तबलिगींमुळे फैलावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
























































