
सिग्नलवर गर्दीचा फायदा घेऊन चालकाचे लक्ष विचलित करत वाहनातून साहित्य चोरणाऱ्या टक टक गँगच्या मालाड आणि बांगूरनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जब्बार यासीन कस्सार, राजा पठाण, मोहम्मद शानू अब्दुल पठाण, गुल्फाम पठाण, मोहम्मद गुल्फाम गुलजार खान अशी त्या पाच जणांची नावे आहेत. त्या पाच जणांकडून पोलिसांनी काही साहित्य जप्त केले आहे.
तक्रारदार हे मालाड परिसरात राहत असून शुक्रवारी रात्री ते घरी जात होते. तेव्हा या टोळीने तक्रारदारांना हेरत त्यांचा मोबाईल घेऊन पळ काढला. मोबाईल चोरीप्रकरणी तक्रारदाराने आरडाओरड केल्यावर पाच जण पळून गेले. हा प्रकार लक्षात येताच बांगूरनगर पोलिसांनी मोहम्मद गुल्फाम खानचा पाठलाग करून त्याला वांद्रे येथून अटक केली. त्यानंतर मालाड पोलिसांनीदेखील तपास करून जब्बार, राजा, मोहम्मद शानू, गुल्फाम पठाणला ताब्यात घेऊन अटक केली.
अटक केलेले ते पाचही जण मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून सध्या विरार येथे राहतात. ही टोळी सायंकाळच्या वेळेस वाहतूककोंडी होते तेव्हा वाहनचालकाचे लक्ष विचलित करून गाडीमध्ये ठेवलेल्या वस्तू चोरून पळ काढतात. मोहम्मद गुल्फाम खान हा मास्टरमाईंड असून त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे, तर मोहम्मद शानूविरोधात डी. एन. नगर, जब्बारविरोधात सांताक्रूझ, राजाविरोधात सहार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. त्या पाच जणांच्या अटकेने मालाड आणि बांगूरनगर पोलिसांनी दोन गुह्यांची उकल केली आहे. त्या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.



























































