
राज्यभरातून मराठा आंदोलक आपल्या न्याय मागण्यांसाठी मुंबईत आले आहेत. आता या पार्व्शभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. गळ्यात भगवे रुमाल अणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. हे पोलीस आंदोलकांच्या गाड्या परत पाठवत आहेत. जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितलंय, असं या पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मराठा आंदोलकांची दिशाभूल करणाऱ्या या पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही. राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोंडी होतेय. आज सकाळपासून सीएसएमटी परिसरात गर्दी झाली आहे. आज काही आंदोलकांनी शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात येत आहे.
काही आंदोलक शेअर बाजारच्या इमारतीमध्ये घुसत होते. यावेळी त्यांना सुरक्षारक्षकांकडून अडवण्यात आले. आम्ही शेअर होल्डर आहोत. आम्हाला शेअर मार्केटचं कार्यालय बघण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमचे पैसे गेले आहेत, असं मराठा आंदोलक म्हणाले. त्यानंतर या परिसरात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. मुंबईच्या आझाद मैदानातील मराठा आंदोलकांना महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने मदत येत आहे. भाकरी, चपात्यांबरोबर तांदूळ, गहू, पाणी, बिस्किट, मसाले, लोणचे इत्यादी साहित्य येण्यास सुरुवात झाली. आलेल्या मदतीचे ढीग लागले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील खेडे गावातून शेतकरी बांधव मदत पाठवत आहेत. आंदोलनाचे दिवस वाढू लागल्याने उपासमार होऊ नये म्हणून मदतीचा ओघ सुरु आहे.