मांजाचा दोर,पक्ष्यांना घोर! पतंग उडवताना घ्या काळजी पक्षीमित्रांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मकर संक्रांतीला धारदार मांजामुळे पक्षी जखमी होतात. अनेकदा त्यांच्या जिवावरही बेतते. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या आधीच कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पक्ष्यांना वाचवण्याचे प्रयत्न नागरिकांनी केले पाहिजेत. संक्रांतीला खबरदारी घेऊन पक्षी वाचवण्याचे आवाहन प्राणी-पक्ष्यांसाठी काम करणाऱया संस्थांनी केले आहे.

या दिवशी कमीत कमी पतंग उडवून व धारदार मांजाचा वापर टाळून पक्ष्यांना वाचवण्यासाठी हातभार लावावा. तिळगूळ वाटून संक्रांत साजरी करावी, असे आवाहन स्पॅरोज शेल्टरचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे.

पतंग उडवताना जखमी होणाऱया पक्ष्यांवर उपचार करण्याचे काम ‘स्पॅरोज शेल्टर’च्या माध्यमातून करण्यात आले. मात्र प्रत्येक ठिकाणी संस्थेच्या स्वयंसेवकांना पोहोचणे शक्य होत नाही. तेव्हा प्रत्येकाने पतंग उडवितानाच याची खबरदारी घ्यायला हवी असे प्रमोद माने म्हणाले. मकार संक्रांतीला नव्हे तर नंतरदेखील झाडांना लटकलेल्या मांजामध्ये पक्षी अडकून जखमी होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे माने यांनी सांगितले. जखमी पक्षी आढळून आल्यास 9867633355 संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

कसा वाचवाल जीव?

कपडा टाकून जखमी पक्ष्याला सुरक्षितपणे पकडा. पक्ष्याच्या शरीरावर अडकलेला मांजा ओढायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे पक्ष्याला आणखी जखम होऊ शकते. पंख कापू नका. मांजा काढल्यानंतर पक्ष्याला एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये किंवा बास्केटमध्ये ठेवा. हवा येण्यासाठी बॉक्समध्ये छिद्र करा. त्वरित एनजीओंना संपर्क साधा. जर पक्ष्याला सांभाळणे शक्य नसेल किंवा मांजा काढायला जमत नसेल तर त्वरित पक्षीमित्रांची मदत घ्या, असे प्लॅन्ट अँड ऑनिमल वेल्फेअर सोसायटी म्हणजेच पॉज, मुंबईचे कार्यकर्ते सुनीश सुब्रमण्यम यांनी सांगितले. पक्ष्यांना वाचवण्यासाठी 9833480388 या हेल्पलाइनवर संपर्क साध्यण्याचे आवाहन त्यांनी केले.

  • पक्ष्यांचा घरटी जास्त असतील अशा ठिकाणी पतंग उडवू नये.
  • काचेचं कोटिंग असलेला मांजा, चायनीज मांजा वापरू नये. कारण धारदार मांजा प्राणीपक्ष्यांना तसेच माणसांनाही हानीकारक आहे.
  • पक्षी मांजामध्ये अडकला असेल, तर पक्षीमित्रांना कळवा. उंचीवर अडकलेल्या पक्ष्याची सुटका करण्यासाठी फायर ब्रिगेडशी संपर्क साधा.