संपूर्ण गाझा ताब्यात घ्या, नाहीतर चालते व्हा! नेतन्याहू यांचे लष्करप्रमुखांना आदेश

शस्त्र खाली ठेवण्याची इस्रायलची ऑफर हमासने धुडकावल्यामुळे बेंजामिन नेतन्याहू संतापले आहेत. नेतन्याहू यांनी इस्रायली संरक्षण प्रमुखांना संपूर्ण गाझा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. आदेश नीट पाळता येत नसतील तर राजीनामा द्या, असेही नेतन्याहू यांनी सुनावले आहे. त्यामुळे इस्रायल व हमासमधील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.

इस्रायलने आतापर्यंत 75 टक्के गाझा पट्टी ताब्यात घेतली आहे. मात्र, 25 टक्के प्रदेश अद्यापही हमासच्या ताब्यात आहे. याच प्रदेशातील खंदकांमध्ये हमासने इस्रायली नागरिकांना बंदी बनवून ठेवले आहे. या नागरिकांमुळे इस्रायली सैन्याला हमासवर थेट कारवाई करणे कठीण झाले आहे. मात्र आता नेतन्याहू यांनी इस्रायली सैन्याला अल्टिमेटम दिला आहे. जमत नसल्यास राजीनामा द्या, असेही त्यांनी लष्करप्रमुखांना सांगितले आहे. नेतन्याहू यांच्या या आदेशामुळे गाझातील परिस्थिती आणखी बिघडण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.

’तो’ व्हिडीओ पाहून खवळले नेतन्याहू

हमासने इस्रायली पैद्यांचा एक व्हिडीओ नुकताच प्रसारित केला आहे. त्यात दोन इस्रायली नागरिक खूपच दयनीय अवस्थेत दिसत आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. त्यांना धड उभेही राहता येत नाही. त्यांना अनेक दिवस खायलाही मिळाले नसल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेतन्याहू खवळले आहेत.